इराणला उत्तर देण्यासाठी इस्रायलकडे पर्याय आहेत

-इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

जेरूसलेम – तुर्कीतील इस्रायली पर्यटकांच्या सुरक्षेला इराणपासून धोका असल्याचे सांगून, इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणला मोठी किंमत चुकती करावी लागेल, असे बजावले होते. याला काही तास उलटत नाही तोच, इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी इराणला धमकावले. ‘इराणने इस्रायली पर्यटकांना लक्ष्य करण्याचा प्रकार करू नये. कारण जर, कधी आवश्यकता निर्माण झाली तर इराणला उत्तर देण्यासाठी इस्रायलने पर्याय तयार ठेवले आहेत’, असा इशारा संरक्षणमंत्री गांत्झ यांनी दिला. त्याचबरोबर तुर्कीतील इस्रायलींनी सुरक्षा यंत्रणेच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन इस्रायलच्या संरक्षमंत्र्यांनी केले.

Israel-respond-Iranगेल्या काही महिन्यांपासून इस्रायलने इराणच्या विरोधातील छुपे युद्ध तीव्र केल्याचा दावा केला जातो. इराणचा अणुकार्यक्रम आणि रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सशी संबंधित अधिकारी व जवानांची हत्या किंवा संशयास्पद मृत्यू होत आहेत. गेल्या दहा दिवसात ड्रोनची निर्मिती करणाऱ्या पथकातील तीन जवानांचा बळी गेला. या हल्ल्यांमागे इस्रायल असल्याचा आरोप इराणची माध्यमे करीत आहेत. तर या छुप्या युद्धामुळे संतापलेला इराण देखील परदेशातील इस्रायली हितसंबंधांना लक्ष्य करू शकतो, असे इस्रायली विश्लेषकांनी म्हटले होते.

इस्रायलने इराणमधील हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण गेल्या काही दिवसांपासून इस्रायलच्या यंत्रणा तुर्कीत पर्यटनासाठी गेलेल्या आपल्या नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी या पार्श्वभूमीवर, तुर्कीतील आपल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याची सूचना केली होती. तसेच इराणने दुसऱ्या देशांमध्ये पर्यटन किंवा व्यवसायासाठी गेलेल्या इस्रायली नागरिकांवर हल्ले चढविले, तर त्याची मोठी किंमत इराणला चुकवावी लागेल, असे बजावले होते. इस्रायली नागरिकांवर हल्ले चढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवादी आणि त्यांना धाडणाऱ्यावर हल्ले चढविल्याखेरीज इस्रायल स्वस्थ बसणार नसल्याचे पंतप्रधान बेनेट यांनी जाहीर केले होते.

याला काही तास उलटत नाही तोच, इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना, इस्रायल तुर्कीच्या यंत्रणांशी संपर्कात असल्याचे सांगितले. त्याचबरोबर जर कधी आवश्यकता भासली तर इराणला उत्तर देण्यासाठी इस्रायलने सर्व पर्याय तयार ठेवल्याचा दावा संरक्षणमंत्री गांत्झ यांनी केला. पण इस्रायलच्या या सामर्थ्याची इराणने परिक्षा घेऊ नये, असे गांत्झ यांनी धमकावले. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये इस्रायल व तुर्कीच्या यंत्रणांनी इस्रायली नागरिकांवरील हल्ल्याचा एक डाव उधळण्यात आल्याचा दावा संरक्षणमंत्री गांत्झ यांनी केला.

दरम्यान, तुर्की व्यतिरिक्त युएई, बाहरिन, जॉर्डन आणि इजिप्त या देशांमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इस्रायली नागरिकांवरही हल्ले होऊ शकतात, अशी माहिती समोर आली आहे. यापैकी जॉर्डन व इजिप्त हे इस्रायलबरोबर सहकार्य असलेले देश आहेत. तर युएई व बाहरिन यांनी इस्रायलसोबत अब्राहम करार करून नुकतेच सहकार्य प्रस्थापित केलेले आहे. त्यामुळे इराण इस्रायलशी सहकार्य करणाऱ्या अरब देशांमधील इस्रायली नागरिकांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

leave a reply