कुर्दिस्तानमध्ये हल्ले चढविणाऱ्या तुर्कीला इराकने समन्स बजावले

- अरब लीग, अमेरिका, जर्मनीकडून तुर्कीवर टीका

समन्स बजावलेबगदाद/अंकारा – इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातील उद्यानात झालेल्या रॉकेट हल्ल्यात नऊ जणांचा बळी गेला तर 28 जण जखमी झाले. स्थानिकांचा बळी घेणाऱ्या या हल्ल्यासाठी तुर्की जबाबदार असल्याचा ठपका ठेवून इराकने तुर्कीच्या राजदूताला समन्स बजावले. इराकमधील हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे सांगून तुर्कीने आपल्यावरील आरोप फेटाळले. पण याआधीही इराकच्या कुर्दिस्तान प्रांताला लक्ष्य करणाऱ्या तुर्कीच्या या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. अमेरिका, जर्मनीसह अरब लीगने देखील तुर्कीवर ताशेरे ओढले आहेत.

इराकमधील स्वायत्त प्रांत असलेल्या कुर्दिस्तानच्या झाखो शहरात बुधवारी रॉकेट हल्ले झाले. येथील एका उद्यान व आसपाच्या भागात कोसळलेल्या या रॉकेट्सच्या माऱ्यात नऊ जणांचा बळी गेला. यात दोन मुलांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. तुर्कीच्या लष्कराने हे रॉकेट हल्ले चढविल्याचा आरोप इराकी यंत्रणांनी केला. याबरोबर इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-कधीमी यांनी तुर्कीचे हल्ले इराकच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणारे असल्याची टीका केली. तसेच इराक आपल्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी प्रत्युत्तर देखील देऊ शकतो, असा इशारा पंतप्रधान कधीमी यांनी दिला.

समन्स बजावलेयानंतर इराकने बगदादमधील तुर्कीच्या राजदूतांना समन्स बजावले. या प्रश्नावर तुर्कीतील आपल्या राजदूताला मायदेशी बोलविण्याची तयारीही इराकने केली आहे. तसेच तुर्कीने इराकच्या उत्तरेकडील भागात तैनात केलेले आपले लष्कर त्वरीत मागे घ्यावे, अशी सूचना इराकने केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुर्कीने कुर्द दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केल्याचे जाहीर केले होते. यासाठी तुर्कीने इराकच्या उत्तरेकडील भागात आपले जवान तैनात केले होते.

समन्स बजावलेपण कुर्दिस्तान प्रांतातील हल्ल्यात नागरिकांचा बळी गेल्यानंतर तुर्कीच्या या तैनातीच्या विरोधात इराकी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बगदादमधील तुर्कीच्या दूतावासासमोर इराकी नागरिकांनी जोरदार निदर्शने केली. तसेच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांच्याविरोधात निदर्शकांनी जोरदार घोषणा दिल्या.यावेळी काही निदर्शकांनी तुर्कीच्या दूतावासावर दगडफेक केल्याच्या बातम्याही आल्या होत्या. कुर्दिस्तानमधील हल्ल्याबाबत इराकने केलेले आरोप तुर्कीने फेटाळले आहेत. आपल्या लष्कराने कुर्दिस्तानमध्ये हल्ला चढविलाच नसल्याचा दावा तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलूत कावुसोग्लू यांनी केला.

दरम्यान, इराकमधील या हल्ल्यावर जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दहशतवादविरोधी संघर्षात कुर्दांचे सहाय्य घेणाऱ्या अमेरिका व जर्मनीने तुर्कीने चढविलेल्या या हल्ल्यांवर ताशेरे ओढले. इराकच्या सार्वभौमत्वाच्या सुरक्षेबाबत अमेरिका वचनबद्ध असून त्याचे उल्लंघन खपवून घेणार नसल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तर जर्मनीने इराकी जनतेवरील हल्ला आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणारे ठरते, असे म्हटले आहे. तर तुर्कीने शेजारी देशांच्या सीमेचा आदर करावा आणि कुठल्याही अरब देशावर हल्ला चढविण्याचा विचारही करू नये, असा इशारा अरब लीगने दिला आहे.

leave a reply