सौदीवरील हल्ल्यांसाठी इराकचे लॉंचपॅड होऊ देणार नाही

- इराकच्या पंतप्रधानांची ग्वाही

लॉंचपॅडरियाध – ‘सौदी अरेबिया हा आपला सहकारी देश आहे. सौदीवरील हल्ल्यांसाठी इराकच्या जमिनीचा लॉंचपॅड म्हणून वापर होऊ देणार नाही’, अशी ग्वाही इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-काधीमी यांनी दिली. त्याचबरोबर इराक आणि सौदीतील संबंध बिघडविण्यासाठी काही जणांच्या कुरापती सुरू असल्याचा आरोप इराकच्या पंतप्रधानांनी केला.

इराकचे पंतप्रधान काधीमी हे दोन दिवसांच्या सौदी भेटीवर होते. यावेळी त्यांनी सौदीचे राजे सलमान, क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैझल यांची भेट घेतली. या भेटीत पंतप्रधान काधीमी यांनी सुरक्षेच्या मुद्यावर सौदीला आश्‍वस्त केल्याचा दावा दोन्ही देशांची माध्यमे करीत आहेत.

यावर्षी जानेवारी महिन्यात स्फोटकांनी भरलेले ड्रोन सौदीची राजधानी रियाधमधील राजघराण्याच्या अल-यामामा या मुख्य इमारतीजवळ कोसळले होते. सदर ड्रोन इराकमधून प्रक्षेपित करण्यात आले होते, असा दावा अमेरिकी माध्यमांनी केला होता. इराकमधील इराणसंलग्न गटाने या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली होती. पण इराकने सदर गटाचा दावा खोडून काढला होता. तसेच इराकमधून सौदीवर हल्ला झालाच नव्हता, असे पंतप्रधान काधीमी म्हणाले होते.

लॉंचपॅडमहिन्याभरापूर्वी सौदीचे संरक्षणदलप्रमुख मेजर जनरल फयाद यांनी इराकचा दौरा केला होता. या दौर्‍यातही सौदीच्या संरक्षणदलप्रमुखांनी इराकमधून आपल्या देशात होणार्‍या हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली होती. तसेच इराकच्या वाळवंटात खोलवर इराणी बनावटीची क्षेपणास्त्रे दडविलेली असल्याचे सूचक विधान केले होते. इराकमधील कट्टरपंथी गटांना इराण क्षेपणास्त्रे, रॉकेट्स पुरवित असून यामुळे सौदीच्या सुरक्षेला धोका असल्याचा इशारा सौदीच्या संरक्षणदलप्रमुखांनी दिला होता.

काही महिन्यांपूर्वीच काधीमी यांनी इराकच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली आहे. पंतप्रधान काधीमी यांच्या सरकारमधील नेते तसेच संसद सदस्य इराणधार्जिणे असल्याचा दावा केला जातो. पण पंतप्रधान काधीमी यांचे सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचेही बोलले जाते. या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान काधीमी यांच्या सौदी भेटीचे महत्त्व वाढले आहे.

पंतप्रधान काधीमी यांनी राजे सलमान यांच्याबरोबरील चर्चेत इराकच्या देशाच्या भूभागाचा वापर सौदीविरोधात केला जाणार नाही, याचे आश्‍वासन दिले. तसेच दोन्ही देशांमधील संबंध बिघडविण्यासाठी कुरापती सुरू असल्याचे सांगून पंतप्रधान काधीमी यांनी आपल्या देशातील इराणसंलग्न गट तसेच इराणला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. दरम्यान, काधमी यांच्या या दौर्‍यात सौदी व इराकमध्ये पाच करार झाल्याचे समोर येत आहे.

leave a reply