आखातापासून वेगळे न काढता येणार्‍या इस्रायलबरोबर इराकने अब्राहम करार करावा

- इराकमधील तीनशेहून अधिक नेत्यांची मागणी

इरबिल – ‘इराकने इस्रायलबरोबर पूर्ण राजनैतिक सहकार्य प्रस्थापित करून परस्पर विकास व समृद्धीचे नवे धोरण स्वीकारावे. इतर अरब देशांप्रमाणे इराकने देखील इस्रायलसोबत अब्राहम करारात सहभागी व्हावे.’, अशी मागणी इराकमधील ३१२ प्रभावी नेते व कार्यकर्त्यांनी केली. त्याचबरोबर इस्रायलला आखातापासून वेगळे काढता येणार नाही, असे लक्षवेधी विधान या नेत्यांनी केले. यामध्ये शिया व सुन्नी या दोन्ही समुदायाच्या नेत्यांचा समावेश होता. इराण व हिजबुल्लाहचे नेते इस्रायलला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्याच्या घोषणा करीत असताना, इराकमधून इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्याची मागणी ही फार मोठी घटना ठरते.

इराकच्या कुर्दिस्तान प्रांताची राजधानी इरबिल येथे शुक्रवारी विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकास्थित ‘सेंटर फॉर पीस कम्युनिकेशन’ने आयोजित केलेल्या परिषदेत इराकधील शिया, सुन्नी गट तसेच टोळ्यांचे प्रमुख, वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि तरुणांचा समावेश होता. या परिषदेत काही नेत्यांनी इराक व इस्रायलमध्ये समोरासमोर चर्चा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

‘आखातातील संघर्ष संपुष्टात आणून स्थैर्य प्रस्थापित करायचे असेल तर इस्रायलसह शांती आवश्यक आहे. इस्रायलला आखातापासून वेगळे काढता येणार नाही, म्हणूनच या क्षेत्राचा भाग असणार्‍या इस्रायलबरोबर इराकने सहकार्य करावे. इराकच्या सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलसह अब्राहम करारात सहभागी व्हावे’, असे आवाहन ‘सन्स ऑफ इराक अवेक्निंग मुव्हमेंट’चे नेते विसाम अल-हरदान यांनी केले.

यासाठी हरदान यांनी आखातातील इतर देशांमधील परिस्थितीकडे इराकी नेत्यांचे लक्ष वेधले. ‘सिरिया, लिबिया, लेबेनॉन आणि येमेन सारखे देश संघर्षामध्ये बुडालेले असताना, अब्राहम करार इराकला शांती, आर्थिक विकास आणि बंधुत्व प्रदान करील. त्यामुळे इराकचे सरकार जुलमी राजवट, अराजकता यांची निवड करणार की सभ्यता, शांती व विकास, हे आता आपणच ठरवायचे आहे’, असे हरदान यांनी फटकारले. त्याचबरोबर इराकमधील ज्यूधर्मियांना देशाबाहेर हाकलून देण्याचा प्रकार अतिशय निंदनीय होता, अशी टीका हरदान यांनी केली. इराकमधील या परिषदेचे इस्रायलने स्वागत केले.

दरम्यान, इराकमधील इराणधार्जिणे सरकार इस्रायलविरोधी असून गेली काही दशके इराकची भूमिका इस्रायलविरोधी राहिली आहे. १९६७ ते १९७३ सालापर्यंत चाललेल्या इस्रायल-अरब युद्धात इराकने इस्रायलविरोधात सर्वात मोठी लष्करी तैनाती केली होती. तर १९८१ साली इराकचे तत्कालिन हुकूमशहा सद्दाम हुसेन छुप्यारितीने अण्वस्त्रनिर्मिती करीत असल्याचा आरोप करून इस्रायलने इराकच्या ओसिराक प्रकल्पावर हवाई हल्ले चढविले होते. तर १९९१ सालच्या आखाती युद्धात सद्दामने इस्रायलवर स्कड क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. पण इराकमधील कुर्द नेते व गट इस्रायलबरोबर सहकार्य करीत असल्याचा दावा केला जातो.

leave a reply