लॅटिन अमेरिकेच्या सागरी हद्दीत चीनच्या ‘ओव्हरसीज् फ्लीट’च्या हालचाली वाढल्या

लिमा/बीजिंग – चीनची १४० कोटीहून अधिक लोकसंख्या दरवर्षी जगातील सुमारे ४५ टक्के मासे फस्त करते. आपल्या वाढत्या लोकसंख्येची ही गरज भागविण्यासाठी चीनने आपली सागरी हद्द ओलांडून इतरांच्या हद्दीत घुसखोरी सुरू केली आहे. या घुसखोरीचे तीव्र पडसाद आता उमटू लागले असून लॅटिन अमेरिकेतील देशांनी चीनकडून होणार्‍या अनियंत्रित मासेमारीला रोखण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पेरु, इक्वेडोर व चिलीसारख्या देशांनी यासाठी पुढाकार घेतला असून अमेरिका व फ्रान्ससारख्या देशांनीही हा मुद्दा गांभीर्याने घेतल्याचे संकेत मिळत आहेत.

आपली सागरी हद्द सोडून इतरांच्या हद्दीत मासेमारी करण्यासाठी चीनने अवाढव्य ‘डिस्टंट वॉटर फिशिंग फ्लीट’ उभारला आहे. ब्रिटनच्या ‘ओव्हरसीज् डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’च्या अहवालानुसार, चीनच्या या फ्लीटमध्ये तब्बल १७ हजार जहाजे व नौका आहेत. एकट्या पेरुच्या सागरी हद्दीनजिक चीनच्या या फ्लीटची ५५० हून अधिक जहाजे बेकायदा व अनियंत्रित मासेमारी करीत असल्याचे आढळले आहे. २०२० साली या जहाजांनी लॅटिन अमेरिकी देशांच्या सागरी हद्दीतून साडेतीन लाख टनांहून अधिक ‘स्क्विड’ मासे पकडले होते.

चीनच्या या बेकायदा मासेमारीमुळे एकट्या चिलीचे जवळपास ४० कोटी डॉलर्सचे नुकसान झाल्याची माहिती ‘नॅशनल फिशिंग ऍण्ड ऍक्वाकल्चर सर्व्हिस’ या सरकारी यंत्रणेने दिली आहे. चिलीच्या सागरी हद्दीत व त्यापलिकडील क्षेत्रात असणार्‍या माशांमध्ये तब्बल ७० टक्क्यांची घटही नोंदविण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी इक्वेडोरच्या यंत्रणांनी एका चिनी जहाजावरून सहा हजार मृत शार्क मासे जप्त केले होते. या घटना चीनच्या अनियंत्रित मासेमारीने मर्यादा ओलांडून इतर देशांच्या नैसर्गिक स्रोतांची कशी लूट चालवली आहे, याचे ठळक उदाहरण ठरतात.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात गॅलापॅगोस आयलंडनजिक आलेल्या चीनच्या ‘नेव्हल मिलिशिआ’च्या घटनेने लॅटिन अमेरिकेतील चिनी मासेमारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला होता. याप्रकरणी आता लॅटिन अमेरिकी देश आवाज उठवित असून पेरु व इक्वेडोरसारख्या देशांनी तटरक्षक दल तसेच नौदलाची गस्त वाढविली आहे. दुसर्‍या बाजूला अमेरिका व फ्रान्ससारखे देशही या हा मुद्दा गांभीर्याने घेत असल्याचे संकेत मिळत आहेत.

अमेरिकेने आपल्या तटरक्षक दलाचे अधिकार वाढविले असून त्यांच्यावर पॅसिफिक महासागरातील गस्त व टेहळणीचीही जबाबदारी दिली आहे. यासाठी लॅटिन अमेरिका व पॅसिफिक क्षेत्रातील देशांचे सहाय्य घेण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. फ्रान्सनेही ‘साऊथ पॅसिफिक’मधील देशांना एकत्र घेऊन संयुक्त तटरक्षक दल उभारण्याचे जाहीर केले आहे.

leave a reply