सरकार पाडण्यासाठी इराकी निदर्शक पुन्हा एकदा बगदादच्या रस्त्यावर

-इराणविरोधात जोरदार घोषणा दिल्या

iraq protestबगदाद – गेल्या अकरा महिन्यांपासून इराकमध्ये निर्माण झालेली राजकीय कोंडी फोडून इराणधार्जिणी राजवट उलथून टाका, अशी मागणी करत हजारो इराकींनी राजधानी बगदादमध्ये जोरदार निदर्शने केली. अकरा वर्षांपूर्वी अरब-आखाती देशांमध्ये फार मोठ्या उलथापालथी घडविणाऱ्या ‘अरब स्प्रिंग’च्या निदर्शनांमध्ये देण्यात आलेल्या घोषणाही यावेळीही देण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा एकदा इराक अरब स्प्रिंगच्या दिशेने पुढे जात आहे की काय, अशी चिंता काही विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

गेल्या आठवड्यात इराकमधील प्रभावी शिया नेते मुक्तदा अल-सद्र यांनी राजकारण सोडून दिल्याची घोषणा केल्यानंतर इराकमध्ये हिंसाचार भडकला होता. यामध्ये ३० जण ठार तर ४०० हून अधिक जण जखमी झाले होते. त्यानंतर अजूनही इराक शांत झालेला नाही. सद्र यांचे समर्थक रस्त्यावर उतरून इराकमधील सरकारला खुले आव्हान देत आहेत. राजधानी बगदाद आणि येथील अतिसंरक्षित ग्रीन झोन सरकार आणि इराणविरोधी निदर्शनांचे केंद्र ठरत आहेत.

muqtada al sadrशुक्रवारी बगदादमधील अल-नुसूर चौक सरकारविरोधी निदर्शकांनी भरलेले होते. इराकी राष्ट्रध्वज आणि बॅनर्स हातात घेऊन निदर्शकांनी इराकमधील सरकार पाडण्याची मागणी केली. गेल्या दशकभरात भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या इराकमधील सर्व नेत्यांना सरकार आणि राजकारणातून हाकलून लावा, अशा घोषणा निदर्शकांनी दिल्या. त्याचबरोबर २०१९ सालच्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये बळी गेलेल्यांना न्याय देण्याची, हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी निदर्शकांनी केली.

यावेळी ‘जनता राजवट उलथण्याची मागणी करीत आहे’, अरब स्प्रिंगमध्ये देण्यात आलेल्या घोषणांचाही समावेश होता. तसेच इराकच्या राजकारणात इराणच्या वाढत्या हस्तक्षेपाविरोधातही निदर्शक आक्रमक झाले होते. ‘यापुढे इराण किंवा इराणसंलग्न नेते इराकवर राज्य करणार नाहीत’, ‘इराणने इराकची दुर्दशा केली’, ‘इराण समर्थक नेत्यांची हकालपट्टी करा’, अशा घोषणा देऊन निदर्शकांनी आपला इराणविरोध प्रदर्शित केला.

गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात इराकमधील निवडणुकीत शियापंथियांच्या उग्र संघटनेचे नेते मुक्तदा अल-सद्र यांच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. तरीही या पक्षाला सरकार स्थापनाची संधी न देता, इराणचे पाठबळ लाभलेल्या इराकमधील राजकीय पक्षांनी एकत्र येऊन सरकारची स्थापना केली होती. यामुळे खवळलेल्या सद्र व त्यांच्या समर्थकांनी इराकमध्ये नव्याने निवडणूक घेण्याची मागणी केली होती. पण इराणसमर्थक सरकारने निवडणुकीची मागणी धुडकावल्यानंतर सद्र यांनी राजकारण सोडून दिल्याचे जाहीर केले. त्याबरोबर सद्र यांच्या समर्थकांनी इराकच्या राजधानीमध्ये हाहाकार माजवून साऱ्या देशाला वेठीस धरण्याची ताकद आपल्याकडे असल्याचे दाखवून दिले होते.

दरम्यान, इराकमधील या घडामोडींवर आखातातील विश्लेषकांनी चिंता व्यक्त केली आहे. वेळीच इराकमधील राजकीय कोंडी फोडली नाही तर या देशात अस्थैर्य निर्माण होईल, गृहयुद्ध भडकेल व त्याचे पडसाद केवळ इराकच नाही, तर आखाती क्षेत्रात उमटतील, असा इशारा विश्लेषक देत आहेत.

leave a reply