इराणवरील हल्ल्यासाठी अमेरिका इस्रायलला ‘इंधनवाहू टँकर’ पुरविणार

KC-46_refuels_F-35वॉशिंग्टन – अमेरिकेतील विमाननिर्मिती कंपनी ‘बोईंग’ इस्रायलला चार ‘केसी-४६’ इंधनवाहू टँकर पुरविणार आहे. बोईंगने अमेरिकेच्या संरक्षण विभागाबरोबर यासंबंधी करार केला आहे. इराणवरील हल्ल्यासाठी रवाना होणाऱ्या इस्रायलच्या विमानांना या इंधनवाहू टँकरद्वारे हवेतच इंधन पुरविता येऊ शकते, याकडे अमेरिकी विश्लेषक लक्ष वेधत आहेत. त्यामुळे अमेरिकेकडून इस्रायलला इंधनवाहू टँकरचा पुरवठा अतिशय महत्त्वाचा ठरतो, असे या विश्लेषकांचे म्हणणे आहे.

इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांच्या नुकत्यार पार पडलेल्या पेंटॅगॉनच्या भेटीत हा करार पार पडला. अमेरिका दरवर्षी इस्रायलला पुरवित असलेल्या ३.८ अब्ज डॉलर्सच्या लष्करी निधीतून एक अब्ज डॉलर्सचा हा करार करण्यात आला आहे. यानुसार, २०२५ सालापर्यंत सदर इंधनवाहू टँकर्स इस्रायलच्या हवाईदलात सामील होतील. यामुळे लढाऊ तसेच इतर विमानांना इंधन पुरवठा करणे सोप होणार असल्याचा दावा केला जातो. अमेरिकेने २०२५ सालाच्या आधी ही विमाने आपल्याला पुरवावी, अशी इस्रायलने मागणी केली आहे. पण सध्या तरी अमेरिकेने इस्रायलची ही मागणी नाकारल्याची माहिती समोर येत आहे.

इस्रायलच्या हवाईदलात बोईंगचे ७०७ इंधनवाहू टँकर आहे. पण ४५ वर्ष जूने असलेले सदर टँकर बदलण्यासाठी इस्रायलची धडपड सुरू होती. केसी-४६ च्या समावेशामुळे इस्रायलच्या हवाईदलाच्या सामर्थ्याची कक्षा अधिकच रुंदावतील, असा दावा इस्रायली विश्लेषक करीत आहेत.

leave a reply