आयएस’शी संलग्न ‘निओ-जेएमबी’च्या दहशतवाद्यांचे आसाममध्ये जाळे

दिसपूर – बांगलादेशी दहशतवादी संघटना ‘निओ-जमात-उल मुजिहद्दीन बांगलादेश’ने (निओ-जेएमबी) आसाममध्ये आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. या संघटनेचे बांगलादेशातून पळून आलेले दहशतवादी आसाम आणि पश्‍चिम बंगालमध्ये ब्रह्मपूत्रेच्या उत्तरी किनार्‍यावर असलेल्या अवैध निर्वासितांच्या वस्त्यांमधून दडून बसले असल्याची माहिती आसाम पोलिसांना मिळाली आहे. याकडे नवा धोका म्हणून आसाम पोलीस पाहत आहेत. ‘निओ-जेएमबी’ ही संघटना ‘आयएस’शी सलग्न असल्याने सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क झाल्या आहेत.

बांगलादेशात गेल्या चार-पाच वर्षांपासून दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहिम उघडण्यात आली आहे. त्यामुळे कित्येक दहशतवादी भारतीय सीमेत घुसून दडून बसत आहेत. बांगलादेशात कार्यरत विविध दहशतवादी संघटनांचे दहशतवादी भारतात अवैध मार्गाने शिरकाव करून वस्त्यांमध्ये लपून राहत आहेत. यामध्ये आसाममध्ये ‘निओ-जेएमबी’ या संघटनेच्या दहशतवाद्यांचे प्रमाण मोठे असल्याची माहिती मिळाली आहे. आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महंता यांनीही ‘निओ-जेएमबी’ संघटना आसाममध्ये जाळे विणत असल्याच्या वृत्तला दुजोरा दिला. तसेच या नव्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी पोलीस तयार असल्याचे महंता यांनी म्हटले आहे.

बांगलादेशात कित्येक दहशतवादी हल्ले घडविणार्‍या ‘जमात-उल मुजिहद्दीन बांगलादेश’ (जेएमबी) पासून वेगळे झालेल्या काही कट्टरपंथी दहशतवाद्यांनी ‘निओ-जेएमबी’ स्थापन केली आहे. ‘निओ-जेएमबी’ने बांगलादेशात याआधी काही मोठे हल्ले घडविले आहेत. २०१६ साली २० जणांचा बळी घेणार्‍या ढाकातील दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदा या संघटनेकडे सर्वांचे लक्ष गेले.

‘निओ-जेएमबी’ ही दहशतवादी संघटना ‘जेएमबी’ या दहशतवादी संघटनेपासून जन्माला आली असली, तरी ती ‘जेएमबी’हून घातक असल्याचा दावा केला जातो. या संघटनेचे अनेक सदस्य उच्च शिक्षित आणि संपन्न कुटुंबातील असल्याचे म्हटले जाते. तसेच या संघटनेमध्ये महिलांचीही मोठ्या प्रमाणावर भरती केली जाते. बांगलादेशात तेथील सुरक्षा यंत्रणांनी राबविलेल्या मोहिमेत या संघटनेच्या काही महिला दहशतवाद्यांना अटक झाली होती. भारतातही २०१८ साली बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांच्या बौध गयामधील दौर्‍याच्या वेळी कमी क्षमतेचे स्फोट झाले होते. यामागे ‘निओ-जेएमबी’ दहशतवाद्यांचा हात होता. हा स्फोट घडविणार्‍या दोघांना पश्‍चिम बंगालमधून अटक झाली होती. त्यामुळे आसामच्या सुरक्षा यंत्रणासंमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. लॉकडाऊनच्या काळात या संघटनेने ब्रह्मपूत्रेच्या उत्तरेकडील किनारपट्टी भागात आपले जाळे आणखी विस्तारले असून यासाठी ‘जेएमबी’च्या जुन्या नेटवर्कचा वापर केला जात असल्याचा दावा केला जातो. तसेच बनावट ओळखपत्रांचा वापर करून ‘निओ-जेएमबी’चे दहशतवादी जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचून आपला विस्तार वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अवैध निर्वासितांच्या वस्त्यांमध्ये ‘निओ-जेएमबी’ संघटनेच्या सदस्यांचा वावर असल्याचे म्हटले जाते. तसेच या भागातही महिलांची संघटनेत भरती करण्यावर भर दिला जात असल्याचे वृत्त सुरक्षा यंत्रणांच्या हवाल्याने समोर येत आहे. याआधी ‘जेएमबी’चे कित्येक दहशतवादी देशभरात पकडले गेले आहेत. २०१४ साली पश्‍चिम बंगलाच्या बर्दवानमध्ये झालेल्या स्फोटात ‘जेएमबी’चे नाव समोर आले होते. त्यानंतर तपास यंत्रणांच्या चौकशीत ‘जेएमबी’ने भारतात आपले जाळे मोठ्या प्रमाणावर विस्तारल्याचे लक्षात आले. भारतात गेल्या पाच वर्षात ‘जेएमबी’चे १२० दहशतवादी पकडले गेले आहेत. यातील ५९ दहशतवाद्यांना आसाममध्ये अटक झाल्याचे गेल्यावर्षी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. कीशन रेड्डी यांनी संसदेत सांगितले होते. आता आसाममध्ये ‘निओ-जेएमबी’चा धोका वाढला आहे.

leave a reply