सिरियातील ‘आयएस’च्या हल्ल्यात ३७ जवानांचा बळी

दमास्कस – ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी सिरियाच्या पूर्वेकडील ‘देर अल-झोर’ प्रांतात सिरियन?लष्कराच्या बसवर चढविलेल्या हल्ल्यात ३७ जवानांचा बळी गेला. गेल्या वर्षभरात ‘आयएस’ने सिरियन लष्करावर चढविलेला हा सर्वात भीषण हल्ला मानला जातो. या वर्षी सिरियातील संघर्षात किमान ६८०० जणांचा बळी गेल्याची माहिती सिरियातील मानवाधिकार संघटनेने दिली.

सिरियाच्या ‘पालमिरा’ शहराजवळच्या खोबाजेप या भागात दहशतवाद्यांनी हा हल्ला घडविला. या हल्ल्याचे स्वरुप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सिरियन मुखपत्राने या हल्ल्यात नागरिकांचा बळी गेल्याचे म्हटले आहे. तर मानवाधिकार संघटना सिरियन लष्कराचे जवान ठार झाल्याचा दावा करीत आहे. यामध्ये आठ अधिकार्‍यांचा समावेश असल्याचेही मानवाधिकार संघटनेचे म्हणणे आहे. सिरियन जवान सुट्टी काढून घरच्या वाटेवर असताना दहशतवाद्यांनी घातपात घडविल्याची माहिती मानवाधिकार संघटनेने दिली.

या व्यतिरिक्त सिरियातील सूत्रांच्या हवाल्याने आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरियन लष्करातील ‘फोर्थ ब्रिगेड’ या पॅरा जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. सिरियन लष्करासाठी हा मोठा हादरा ठरतो. या भागात इराण तसेच इराणसंलग्न दहशतवादी संघटनांचे देखील तळ असल्याचा दावा केला जातो. इराकच्या सीमेजवळ असलेल्या सिरियाच्या या भागात इराणने लष्करी तळ तसेच शस्त्रास्त्रांची गोदामे उभारली आहेत. त्याचबरोबर इराणने सिरियात कट्टरपंथियांची भरती सुरू केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी सिरियामध्ये लष्करी प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. ‘देर अल-झोर’ प्रांतातील ‘अल मयादान’ भागात रिव्होल्युशनरी गार्ड्सचे जवान कट्टरपंथियांना ४० दिवसांचे प्रशिक्षण देत असून किमान शंभर स्थानिक यात सामील झाल्याची माहिती सिरियन मानवाधिकार संघटनेने दिली. सिरियाच्या मयादानमध्ये इराणसमर्थक मोठ्या संख्येने आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झालेले इराणचे मेजर जनरल कासेम सुलेमानी यांचा या भागावर मोठा प्रभाव होता, असा दावा केला जातो.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून ‘देर अल-झोर’ प्रांतावर अमेरिकेने हवाई हल्ले चढवून इराण व इराणसमर्थक दहशतवादी गटांना लक्ष्य केले आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात इस्रायलने देखील येथील अल-बुकमल येथील इराणच्या तळावर हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन माध्यमांनी केला होता.

leave a reply