रशियन परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानांवर इस्रायलचा संताप

जेरूसलेम – रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलरबाबत केलेल्या विधानांवर इस्रायलने टीका केली. रशियन परराष्ट्रमंत्र्यांचे वक्तव्य ज्यूंच्या वंशसंहारासाठी ज्यूधर्मियांनाच दोषी धरणारे आहे, अशी नाराजी इस्रायलने व्यक्त केली. रशियाने यासाठी ज्यूधर्मियांची माफी मागावी, असे जाहीर करून इस्रायलने या प्रकरणी रशियन राजदूतांना समन्स बजावले आहेत.

इस्रायलचा संतापरशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी रविवारी इटलीच्या वृत्तवाहिनी ‘झोना बिनाका’ला मुलाखत दिली. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धावर ही मुलाखत आधारलेली होती. यामध्ये इटालियन पत्रकाराने रशियन परराष्ट्रमंत्र्यांना रशियाने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांच्याबाबत केलेल्या विधानांवर प्रश्न केला.

रशियाने युक्रेनमध्ये सुरू केलेले युद्ध म्हणजे नाझींपासून युक्रेनची सुटका, अशी घोषणा रशियाने काही आठवड्यांपूर्वी केली होती. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत रशियाने नाझी लष्करावर हल्ले चढवून ज्यूधर्मियांची सुटका केली होती, याचा संदर्भ रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिला होता. इटलीच्या पत्रकाराने याचा हवाला देऊन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे देखील ज्यूधर्मिय असल्याचे लक्षात आणून दिले. यावर बोलताना, रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी झेलेन्स्की ज्यूधर्मिय असले तरी त्याने युक्रेनमधील नाझीवादाची वस्तुस्थिती बदलत नाही, अशी टीका केली. तसेच ‘नाझी हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर हा देखील ज्यूईश वंशाचा होता, असे मला वाटते’, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह म्हणाले.

रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी ज्यूधर्मियांचा संहार करणाऱ्या हिटलरचे संबंध ज्यूंशी जोडल्यामुळे इस्रायलमधून संताप व्यक्त होत आहे. ‘ज्यूधर्मियांच्या विरोधातील इतिहासातील सर्वात भयंकर वंशसंहाराचे खापर त्यांच्यावरच फोडण्याचा प्रयत्न अशा खोट्या गोष्टी पसरवून केला जात आहे’, असा ठपका इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी केला. तसेच राजकीय हेतूंसाठी ज्यूधर्मियांच्या वंशसंहाराचा वापर करणे त्वरीत थांबवा, असे आवाहनही इस्रायलच्या पंतप्रधानांनी केले.

तर इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी रशियन परराष्ट्रमंत्र्यांची विधाने अक्षम्य आणि निंदनीय असल्याची टीका केली. लॅव्हरोव्ह यांनी भयानक ऐतिहासिक चूक केली असून त्यांनी यासाठी ज्यूधर्मियांची माफी मागावी, अशी मागणी इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली. ज्यूंच्या वंशसंहारासाठी ज्यूधर्मियांनाच दोष देणे म्हणजे सर्वात खालच्या पातळीवरचा वंशद्वेष ठरतो, अशी जळजळीत टीका परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी केली. यानंतर इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियन राजदूत ॲनातोली व्हिक्टोरोव्ह यांना समन्स बजावले. तसेच लॅव्हरोव्ह यांच्या विधानांबाबत रशियाने खुलासा करावा, अशी मागणी केली.

दरम्यान, हिटलरचे ज्यूधर्माशी संबंध नव्हते. पण काही जण असा संदर्भ जोडून ज्यूधर्माला बदनाम करण्याचा डाव रचत असल्याचा आरोप इस्रायली नेते करीत आहेत. तर परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांच्या विधानांमुळे इस्रायल आणि रशियातील संबंध बिघडू शकतात, असा इशारा इस्रायली विश्लेषक देत आहेत.

leave a reply