चीनकडून तैवानला असलेल्या धोक्याच्या मुद्यावर अमेरिका व ब्रिटनमध्ये गोपनीय बैठक

वॉशिंग्टन/लंडन/तैपेई – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून तैवानला असलेला धोका वाढल्याचा दावा तैवानसह विविध देशांचे नेते, अधिकारी व विश्लेषक करीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन अमेरिकेच्या बायडेन प्रशासननाने तैवानच्या सुरक्षेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यात युरोप तसेच इंडो-पॅसिफिकमधील मित्रदेशांना एकत्र करून व्यापक धोरण तयार करण्याचा समावेश आहे. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने ब्रिटनबरोबर एक उच्चस्तरीय व गोपनीय बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच चीनने साऊथ चायना सी व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपल्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून तैवान क्षेत्रानजिक सातत्याने संरक्षणसराव घेण्यात येत आहेत. त्याचवेळी चीनच्या विमानांनीही तैवानच्या हवाईहद्दीत आपली घुसखोरी वाढविली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचे निकाल व परिणाम लक्षात घेऊन तैवानवर हल्ल्याची योजना आखावी, अशी मागणी चीनच्या सत्ताधारी राजवटीतील नेते, अधिकारी तसेच माध्यमांकडून करण्यात येत आहे. चीनच्या या हालचाली लक्षात घेऊन अमेरिकेनेही मित्रदेशांची आघाडी तयार करण्याचे संकेत देत तैवानच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

यासंदर्भात मार्च महिन्यात अमेरिकेचा मित्रदेश असणाऱ्या ब्रिटनबरोबर गोपनीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला अमेरिकेकडून व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकारी कर्ट कॅम्पबेल व नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या सदस्य लॉरा रोझेनबर्गर उपस्थित होत्या. ब्रिटनकडून परराष्ट्र विभाग तसेच सिक्युरिटी कौन्सिलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, असे सांगण्यात येते. ब्रिटनमधील आघाडीचे दैनिक ‘फायनान्शिअल टाईम्स’ने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

अमेरिका व ब्रिटनमध्ये झालेल्या बैठकीत, तैवानवरून अमेरिका-चीन युद्ध झाल्यास ब्रिटनची भूमिका काय असेलव तो कोणती पावले उचलेल, या मुद्यावर प्राधान्याने चर्चा झाली. त्याचवेळी येणाऱ्या काळात ब्रिटन-तैवान सहकार्यात वाढ करण्याच्या मुद्यावरही चर्चा झाली. गेल्या वर्षी ब्रिटनने आपली विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस एलिझाबेथ’ इंडो-पॅसिफिक क्षेत्रात पाठविली होती. या विमानवाहू युद्धनौकेने तैवानच्या सागरी क्षेत्रानजिक प्रवास केला होता. पुढील काळात ब्रिटीश युद्धनौकांचा इंडो-पॅसिफिकमधील वावर वाढविण्याबाबतही बोलणी झाल्याचे सांगण्यात येते. अमेरिकेने चीनला रोखण्यासाठी इंडो-पॅसिफिकमध्ये उभारलेल्या आघाडीत ब्रिटनला सामील करून घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे मानले जाते.

दरम्यान, अमेरिकेने चीनच्या इंडो-पॅसिफिकमधील कारवायांना शह देण्यासाठी पॅसिफिक क्षेत्रातील बेटदेशांची स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही बैठक होईल, अशी माहिती व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ अधिकारी कर्ट कॅम्पबेल यांनी दिली.

leave a reply