इस्रायलकडून युरोपला इंधनपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाला मंजुरी

जेरुसलेम – इस्रायल व सायप्रसमधून युरोपला नैसर्गिक इंधनवायुचा पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाला इस्रायल सरकारने मंजुरी दिली आहे. रविवारी झालेल्या इस्रायली मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. हा निर्णय एक ऐतिहासिक पाऊल असल्याची प्रतिक्रिया इस्रायलचे ऊर्जामंत्री युवल स्टेनिट्झ यांनी दिली. गेल्या काही वर्षांत रशिया व इराणने तुर्कीच्या सहाय्याने युरोपबरोबरील इंधन सहकार्य वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. इस्रायलचा इंधनवाहिनी प्रकल्प त्याला शह देण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जातो.

इस्रायलकडून युरोपला इंधनपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाला मंजुरीयावर्षी जानेवारी महिन्यात ग्रीसमध्ये झालेल्या एका बैठकीत, इस्रायल, सायप्रस व ग्रीस या तीन देशांनी ‘ईस्टमेड इंधनवाहिनी प्रकल्पा’च्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ६.८६ अब्ज डॉलर्स खर्चाच्या या प्रकल्पाअंतर्गत इस्रायलच्या सागरी क्षेत्रातील ‘लेव्हियाथन बेसिन’पासून ग्रीसपर्यंत १,९०० किलोमीटर्स लांबीची इंधनवाहिनी उभारण्यात येणार आहे. खोल सागरी तळाशी उभारण्यात येणाऱ्या या इंधनवाहिनीच्या सर्वेक्षणाचे काम आधीच सुरू झाले असून त्यात युरोपिय कंपन्यांचा सहभाग आहे. या इंधनप्रकल्पासाठी ‘आयजीआय पोसायडन’ या नावाने स्वतंत्र कंपनीही स्थापन करण्यात आली आहे. इस्रायल व युरोपिय महासंघाचा संयुक्त उपक्रम असलेल्या या कंपनीच्या माध्यमातून, २०२५ सालापर्यंत इंधनप्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मूळ ‘ईस्टमेड इंधनवाहिनी प्रकल्प’, इस्रायल-सायप्रस-ग्रीस असा असला, तरी पुढे हीच इंधनवाहिनी इटली आणि युरोपातील इतर बाल्कन देशांपर्यंत वाढविण्याची योजना आहे. या इंधनवाहिनी प्रकल्पातून दरवर्षी १० अब्ज घनमीटर नैसर्गिक इंधनवायुचा पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. काही वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या अहवालांनुसार, इस्रायलच्या सागरी क्षेत्रात सुमारे २,२०० अब्ज घनमीटर नैसर्गिक इंधनवायुचे साठे आहेत. २०१६ साली इस्रायलने राबविलेल्या एका मोहिमेत, सागरी क्षेत्रात ९०० अब्ज घनमीटर इंधनवायुचे साठेही सापडले होते. तर, भूमध्य समुद्राचा भाग असलेल्या सायप्रसच्या सागरी क्षेत्रात १२८ अब्ज घनमीटर इंधनवायुचे साठे असल्याचे सांगण्यात येते.

इस्रायलकडून सायप्रस व ग्रीसच्या सहाय्याने उभारण्यात येणाऱ्या ‘ईस्टमेड इंधनवाहिनी प्रकल्पा’ला तुर्कीकडून सुरू असलेला आक्रमक हालचालींचीही पार्श्वभूमी आहे. सायप्रसचा सागरी क्षेत्रातील इंधनसाठयांवर तुर्कीने आपला हक्क सांगितला आहे. या क्षेत्रात तुर्कीने आपल्या युद्धनौकाही धाडल्या होत्या. काही महिन्यांपूर्वी सायप्रससह ग्रीसच्या सागरी हद्दीतील भाग आपलाच आहे हे दाखविण्यासाठी तुर्कीने परस्पर लिबियाबरोबर करार करून खळबळ उडवली होती. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलचा भूमध्य सागरी क्षेत्रातील वावर तुर्कीच्या कारवायांना शह देणारा ठरू शकतो, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येतो.

leave a reply