इस्रायलच्या अरब देशांबरोबरील संबंधांवर गाझाच्या संघर्षाचा परिणाम होणार नाही

-इस्रायलचे माजी लष्करी अधिकारी आणि विश्‍लेषकाचा दावा

जेरूसलेम – इस्रायल आणि गाझातील दहशतवादी संघटनांमध्ये पेटलेल्या संघर्षाचा थेट परिणाम इस्रायलने अरब देशांबरोबर केलेल्या अब्राहम करारावर होईल. इस्रायल व अरब देशांमधील सहकार्य यामुळे संपुष्टात येईल, असा दावा अमेरिका व आखातातील माध्यमांनी केला होता. पण ‘इस्रायल-हमासमधील संघर्षामुळे अब्राहम करार संपुष्टात येईल, या दाव्यांना आधार नाही. या करारात सहभागी असलेल्या देशांमधील सहकार्यावर इस्रायल-हमासमधील संघर्षाचा काहीही परिणाम होणार नाही’, असे इस्रायलचे निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडिअर जनरल डॉ. मिर एल्रान यांनी स्पष्ट केले.

इस्रायलच्या अरब देशांबरोबरील संबंधांवर गाझाच्या संघर्षाचा परिणाम होणार नाही - इस्रायलचे माजी लष्करी अधिकारी आणि विश्‍लेषकाचा दावागेल्या आठवड्याच्या सोमवारपासून गाझापट्टीतील हमास आणि इस्रायलच्या लष्करामध्ये मोठा संघर्ष पेटला. याचे पडसाद अरब-इस्लामी देशांच्या ‘ऑर्गनायझेशन फॉर इस्लामिक कोऑपरेशन’च्या तातडीच्या बैठकीत उमटले होते. इराण, तुर्की, पाकिस्तान आणि मलेशियाच्या नेत्यांनी या संघर्षासाठी इस्रायलला जबाबदार धरले. त्याचबरोबर इस्रायलशी सहकार्य करणारे संयुक्त अरब अमिरात (युएई), बाहरिन, मोरोक्को, सुदान हे देश देखील तितकेच जबाबदार असल्याचा ठपका इराण, तुर्कीने ठेवला होता.

गेल्या वर्षी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्रायलने युएई, बाहरिन व इतर दोन अरब देशांबरोबर अब्राहम करार केला होता. इस्रायलने गाझावर चढविलेल्या हल्ल्यानंतर अरब देशांनी सदर करारातून माघार घ्यावी, अशी मागणी इराण, तुर्कीने केली होती. अमेरिकेतील आघाडीचे वर्तमानपत्र आणि आखातातील प्रसिद्ध वृत्तवाहिनीने देखील या कराराला लक्ष्य केले होते. तसेच या संघर्षामुळे अब्राहम करार टिकणार नाही, असे दावे केले होते.

पण इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षा योजनेचे माजी प्रमुख आणि ‘इन्स्टिट्युट फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीज्’ (आयएनएसएस) या इस्रायली अभ्यासगटाचे उपप्रमुख ब्रिगेडिअर जनरल एल्रान यांनी अब्राहम करार आणि गाझातील संघर्षाबाबत आपले निष्कर्ष मांडले. इस्रायल-हमास संघर्ष आणि इस्रायल-अरब देशांमधील अब्राहम करार यांच्याबाबत इराण व तुर्की पूर्णपणे आधारहीन दावे करीत असल्याचे ब्रिगेडिअर जनरल एल्रान म्हणाले. त्याचबरोबर अब्राहम करारावर या संघर्षाचा परिणाम होणार नसल्याचे सांगून एल्रान यांनी अमेरिका व आखाती माध्यमे चुकीचे तर्क लावत असल्याचा ठपका ठेवला.

अब्राहम करार हा इस्रायल आणि अरब देशांमधील सहकार्य करार आहे. या कराराचा दोन्ही बाजूंना फायदाच होणार असून या संघर्षाच्या काळातही हे सहकार्य टिकून राहील व यापुढे अधिकच झपाट्याने वाढेल, असा विश्‍वास एल्रान यांनी व्यक्त केला. याउलट, ‘अब्राहम करारात सहभागी असलेले अरब देश पुढे येऊन हा संघर्ष थांबविण्यासाठी हमासला आवाहन करू शकतील. यासाठी जॉर्डन, इजिप्त या अरब देशांचे सहाय्य देखील घेतले जाऊ शकते’, असे एल्रान म्हणाले.

तसेच हमासने आपल्या राजकीय स्वार्थासाठी इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविल्याचा आरोप ब्रिगेडिअर जनरल एल्रान यांनी केला. दोन आठवड्यांपूर्वी जेरूसलेमच्या ‘शेख जराह’ भागात उसळलेल्या दंगलीचा राजकीय फायदा घेण्यासाठी हमासने इस्रायलवर रॉकेट हल्ले चढविल्याचे एल्रान यांनी म्हटले आहे.

इस्रायलच्या अरब देशांबरोबरील संबंधांवर गाझाच्या संघर्षाचा परिणाम होणार नाही - इस्रायलचे माजी लष्करी अधिकारी आणि विश्‍लेषकाचा दावागाझातील संघर्ष आणि अब्राहम कराराबाबत एल्रान यांनी मांडलेल्या निष्कर्षाशी रशियन माध्यमे देखील सहमत असल्याचे दिसत आहे. हमासने इस्रायलवर चढविलेल्या या हल्ल्यांवर अरब देशांमधूनच टीका होत असल्याचे रशियन वृत्तसंस्था निदर्शनास आणून देत आहेत.

गेल्या आठवड्यात युएईने हमासला इस्रायलवर रॉकेट हल्ले रोखण्याचा इशारा दिला होता. आखातातील अस्थैर्यात वाढविणारे हे रॉकेट हल्ले रोखले नाही तर गाझाच्या पायाभूत सुविधांसाठी राखून ठेवलेली गुंतवणूक अडवून ठेवू, असे युएईने हमासला दटावले होते. युएईच्या वरिष्ठ अधिकार्‍याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर इस्रायली वर्तमानपत्राला ही माहिती दिली होती.

तर युएईच्या धार्मिक नेत्यांनी आणि जनतेने सोशल मीडियाद्वारे हमासच्या रॉकेट हल्ल्यांवर टीका केली होती. ‘हमास पॅलेस्टिनींचा मानवी ढालीसारखा वापर करून इस्रायलवर हल्ले चढवित आहे. हमासने गाझापट्टीला पॅलेस्टिनी मुलांची दफनभूमी बनवली आहे. हमासने इजिप्त आणि सिनाईची सुरक्षा धोक्यात टाकली आणि अरब देशांची राष्ट्रध्वज जाळले. हमासला पॅलेस्टिनी मुले आणि वृद्धांबद्दलही आदर वाटत नाही’, अशी जळजळीत टीका युएईतील धार्मिक नेत्याने सोशल मीडियाच्या मार्फत केली होती.

याखेरीज युएई, बाहरिन आणि कुवैतमधून सोशल मीडियावर हमासच्या विरोधात ‘नो टू टेररिझम’, ‘पॅलेस्टाईन इज् नॉट माय कॉझ’ असे ट्रेंड देखील वायरल झाले होते. त्याचा दाखला देऊन इस्रायलचे माजी लष्करी अधिकारी व रशियन वृत्तसंस्था अब्राहम करार सुरक्षित असल्याचा दाखला देत आहेत.

leave a reply