सौदीसह आखाती देशांवर केलेल्या आरोपानंतर लेबनॉनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा राजीनामा

बैरुत/रियाध – लेबेनॉनचे परराष्ट्रमंत्री शार्बेल वेहब यांनी एका मुलाखतीदरम्यान, आखातात ‘आयएस’ ही दहशतवादी संघटना प्रबळ होण्यामागे आखातातील काही देशांचा हात आहे, अशा स्वरुपाचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आखातातील प्रमुख देशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, परराष्ट्रमंत्री वेहब यांनी राजीनामा दिला आहे. लेबेनॉनच्या राजकीय वर्तुळातूनही वेहब यांच्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत असून लेबेनीज फोर्सेस पार्टीने, वेहब लेबेनॉनचे नाही तर हिजबुल्लाहचे परराष्ट्रमंत्री असल्याप्रमाणे बोलत आहेत, अशी टीका केली आहे.

सौदीसह आखाती देशांवर केलेल्या आरोपानंतर लेबनॉनच्या परराष्ट्रमंत्र्यांचा राजीनामागेल्या काही महिन्यांपासून लेबेनॉन राजकीय तसेच आर्थिक अराजकाच्या उंबरठ्यावर आहे. लेबेनॉनची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून हा देश सध्या आखाती देश, युरोप व आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून मिळणार्‍या अर्थसहाय्यावर अवलंबून असल्याचे मानले जाते. चलनाचे मूल्य घसरले असून परदेशी कर्जाची परतफेड तसेच आवश्यक आयातीसाठीही पुरेसा निधी नसल्याचे सांगण्यात येते. देशात काही वर्षे स्थिर सरकार नसून सातत्याने नेतृत्त्व बदलावे लागत आहे.

अशा परिस्थितीत आखातातील आघाडीच्या देशांना उद्देशून वक्तव्य करणे लेबेनॉन सरकारच्या चांगलेच अंगलट आल्याचे दिसत आहे. सोमवारी ‘अल-हुरा टीव्ही’ वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात परराष्ट्रमंत्री शार्बेल वेहब यांनी ‘आयएस’ला आखातात प्रबळ करण्यामागे काही आखाती मित्रदेशांचा हात होता, असे वक्तव्य केले. प्रेमाचे व बंधुत्त्वाचे नाते असलेल्या देशांनी ‘आयएस’ला निनवेह, अन्बर व पालमिरामध्ये येण्याची संधी दिली, असेही परराष्ट्रमंत्री शार्बेल वेहब पुढे म्हणाले. याच कार्यक्रमात एका सौदी विश्‍लेषकाने लेबेनॉनच्या राष्ट्राध्यक्षांनी हा देश हिजबुल्लाहच्या ताब्यात दिल्याचा आरोप केल्याचेही समोर आले आहे.

लेबेनीज परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्यावर आखातातील अरब देशांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बाहरिन व कुवैत या देशांनी लेबेनॉनच्या राजदूतांना समन्स धाडून स्पष्टीकरण मागितल्याचे सांगण्यात आले. सौदीच्या परराष्ट्र विभागाने लेबेनीज मंत्र्यांचे वक्तव्य अपमानास्पद व राजनैतिक नियमांचे उल्लंघन करणारे असल्याचे बजावले आहे. गल्फ कोऑपरेशन काउन्सिलनेही वेहब यांचे वक्तव्य अस्वीकारार्ह असल्याचे सांगून त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष मायकल एऑन यांनी, परराष्ट्रमंत्री वेहब यांचे वक्तव्य वैयक्तिक पातळीवरील असून त्याचा लेबेनॉनच्या धोरणांशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. बुधवारी वेहब यांनी दिलेला परराष्ट्रमंत्री पदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून त्यांच्या जागी संरक्षणमंत्री झैना अकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

leave a reply