भारतीय नौदलासाठी इस्रायलकडून ड्रोनविरोधी ‘स्मॅश 2000 प्लस’ यंत्रणेची खरेदी

‘स्मॅश 2000 प्लस’नवी दिल्ली – लहान ड्रोन्सपासून असणारा धोका लक्षात घेऊन भारतीय नौदलासाठी इस्रायलकडून ड्रोनविरोधी यंत्रणा खरेदी करण्यात येत आहे. ‘स्मॅश 2000 प्लस’ या ड्रोनविरोधी यंत्रणेसाठी इस्रायलला ऑर्डर देण्यात आल्याचे वृत्त आहे.

गेल्या काही काळात छोट्या ड्रोन्सपासून असणारा धोका वाढला आहे. एकाच वेळा हवाई सीमेत घुसखोरी करणाऱ्या एकापेक्षा अधिक ड्रोन्सच्या घुसखोरीमुळे हवाई सुरक्षा अतिशय धोक्यात येऊ शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये जम्मू-काश्‍मीर, पंजाब आणि राजस्थानमधील पाकिस्तान सीमेवर अशा ड्रोन्स वापर पाकिस्तानकडून केला जात आहे. जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवाद्यांना शस्त्रास्त्र पुरविण्यासाठीही ड्रोन्सचा वापर वाढला आहे. भविष्यात इतर सीमांवर व सागरी सीमा कक्षेतही अशा आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, हे ओळखून संरक्षणदलांना या धोक्यासाठी सज्ज केले जात आहे.

‘स्मॅश 2000 प्लस’या पार्श्‍वभूमीवर ड्रोन युद्धासाठी स्वदेशी यंत्रणा विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच भारत अमेरिकेबरोबर ‘ड्रोन स्वार्म’ विकसित करण्यासाठीही प्रयत्त करीत आहे. याशिवाय अमेरिकेबरोबरच ‘काऊंटर-युएएस रॉकेट, आर्टिलरी ॲण्ड मार्टर सिस्टीम’ही भारत विकसित करीत आहे. त्याचबरोबर इस्रायलसारख्या देशाकडून ड्रोनविरोधी युद्धासाठी यंत्रणाही भारत खरेदी करीत आहे.

शत्रूच्या छोट्या ड्रोन्सना लक्ष्य करण्यासाठी नौदलाकरीता ‘स्मॅश 2000 प्लस’ ही इस्रायली यंत्रणा खरेदी करण्यात येत आहे. यासाठी इस्रायलकडे ऑर्डरही नोंदविण्यात आल्याचे वृत्त आहे. ही स्मॅश यंत्रणा एके-47, एके-103 व इतर रायफलवर बसविता येऊ शकते आणि याद्वारे छोट्या ड्रोन्सना अचून लक्ष्य करता येते. ‘स्मॅश 2000 प्लस’ हे इलेक्ट्रो ऑप्टिक साईट प्रणालीने सज्ज असून संगणाद्वारे नियंत्रित करता येते. 120 मीटर लांबून छोट्या ड्रोन्सला यामुळे भेदता येईल. एका ‘स्मॅश 2000 प्लस’ची किंमत दहा लाख रुपये असल्याचे वृत्त आहे. मात्र किती यंत्रणा खरेदी करण्यात येत आहेत, याची माहिती उघड झालेली नाही.

leave a reply