कुणी कल्पनाही केली नसेल, अशा क्षमता इस्रायलकडे आहेत

- इस्रायलचे परराष्ट्रमंत्री लॅपिड

 इस्रायलचे परराष्ट्रमंत्री

जेरूसलेम – ‘इस्रायलकडे अशा काही क्षमता आहेत, ज्यांची त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनाही कल्पना केली नसेल. इराणच्या धोक्यापासून इस्रायल आपले संरक्षण करू शकतो`, असा इशारा इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी इस्रायली वृत्तवाहिनीशी बोलताना दिला. त्याचबरोबर, ‘आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी इस्रायली आवश्‍यक ते सारे काही करील. यासाठी इस्रायलला कुणाच्याही परवानगीची आवश्‍यकता नाही. इस्रायलची स्थापना झाल्यापासून आमची ही भूमिका कायम आहे`, असे लॅपिड यांनी नुकतेच ठणकावले होते.

गेल्या आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या अणुकराराच्या चर्चेवर आपले मत नोंदविले होते. या चर्चेतून चांगला करार होणार असेल तर इस्रायल त्याचे स्वागत करील, असे पंतप्रधान बेनेट म्हणाले होते. परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी इस्रायली वृत्तवाहिनशी बोलताना याचा खुलासा केला.

‘इस्रायल चांगल्या अणुकराराच्या विरोधात नाही. पण वाईट अणुकराराच्या नक्कीच विरोधात आहे`, असे लॅपिड म्हणाले. त्याचबरोबर आपला अणुकार्यक्रम शांतीपूर्ण वापरासाठी असल्याचा दावा करणारा इराण जगाशी खोटे बोलत असल्याचा आरोप लॅपिड यांनी केला. यासंबंधी इस्रायलने जगासमोर सादर केलेले पुरावे पुरेसे असल्याचे इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले.

व्हिएन्ना येथील अणुकराराबाबतची चर्चा नव्याने सुरू होत आहे. पण या चर्चेद्वारे वेळकाढू भूमिका स्वीकारणारा इराण पुढच्या काही आठवड्यांमध्ये अणुबॉम्बची निर्मिती करण्यात यशस्वी होईल, असा दावा इस्रायली गुप्तचर यंत्रणा करीत आहेत. अशा परिस्थितीत, इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायल कुठल्याही पर्यायांचा वापर करू शकतो, असे इस्रायलच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. यासाठी अमेरिकेच्या परवानगीची प्रतिक्षा करणार नसल्याचेही ठणकावले होते. परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी पुन्हा एकदा याबाबतची इस्रायलची भूमिका स्पष्ट केली.

दरम्यान, परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी इस्रायलकडे असलेल्या क्षमतांचा अशारितीने उल्लेख केल्यामुळे विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. इस्रायलच्या लष्करातील आयर्न डोम तसेच कॉर्नर शॉट रायफल्स याआधीच जागतिक लष्करी विश्‍लेषकांच्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत, या क्षेत्रातील विश्‍लेषकांच्या कल्पनेपलिकडील क्षमता आपल्याकडे असल्याचे सांगून लॅपिड यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.

याआधी काही इस्लामी जगतातील विश्‍लेषकांनी इस्रायल जगाला दाखवित नसला तरी या देशाकडे अफाट लष्करी क्षमता असल्याचे दावे केले होते. वेळ येईल तेव्हा अमेरिकेलाही थक्क करून टाकणाऱ्या शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन इस्रायलकडून केले जाईल, असे या विश्‍लेषकांनी इस्लामी देशांना बजावले होते.

leave a reply