प्रगत ‘डाटा सर्व्हिलन्स सिस्टिम`च्या माध्यमातून चीन सोशल नेटवर्किंग साईट्वरील माहिती जमा करीत आहे

- अमेरिकी दैनिकाचा दावा

‘डाटा सर्व्हिलन्स सिस्टिम`वॉशिंग्टन/बीजिंग – चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून फेसबुक व ट्विटरसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील माहिती मोठ्या प्रमाणात जमा करीत असल्याचा दावा ‘द वॉशिंग्टन पोस्ट` या अमेरिकी दैनिकाने केला. परदेशी तसेच परदेशातील चीनविरोधी ‘टार्गेट्स`ची ओळख पटविण्यासाठी याचा वापर करण्यात येत असल्याचे अमेरिकी दैनिकाने म्हटले आहे. चीन सरकारच्या विविध प्रकल्पांशी निगडित कागदपत्रांचा अभ्यास व विश्‍लेषण केल्यावर ही बाब समोर आली आहे. सदर माहितीचा वापर चीनचे लष्कर, पोलीस व इतर सरकारी यंत्रणांकडून करण्यात येत आहे, असेही ‘द वॉशिंग्टन पोस्ट`ने बातमीत म्हटले आहे.

चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी तसेच विविध यंत्रणांनी वेगवेगळी सॉफ्टवेअर्स व प्रोग्राम्स विकसित केले आहेत. एका यंत्रणेने त्यांच्या कामासाठी विकसित केलेली ही सॉफ्टवेअर्स व प्रोग्राम्स चीनच्या इतर सरकारी यंत्रणांकडूनही वापरण्यात येतात. यात परदेशी पत्रकार व शिक्षणतज्ज्ञांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर लक्ष ठेवणाऱ्या सॉफ्टवेअरचाही समावेश आहे. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचा भाग असलेल्या ‘सेंट्रल प्रोपोगंडा डिपार्टमेंट`कडून सॉफ्टवेअर व प्रोगाम्स खरेदी सुरू आहे.

‘डाटा सर्व्हिलन्स सिस्टिम`चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे विरोधक असणाऱ्यांचे भूमिगत नेटवर्क शोधून काढणे, त्यावर लक्ष ठेवणे तसेच सरकारच्या हितसंबंधांना धक्का बसणाऱ्या ‘ट्रेंड्स`बाबत आधीच इशारा देणे यासारख्या गोष्टी सोशल मीडियावरील माहितीच्या साठ्यातून शक्य होतील, असा दावा या बातमीत एका चिनी विश्‍लेषकाने केला आहे. चीनच्या ‘सेंट्रल प्रोपोगंडा डिपार्टमेंट`ने परदेशातील काही सोशल मीडिया अकाऊंट्स खरेदी केल्याचे उघड झाले आहे. चीनच्या राजवटीने यापूर्वी देशांतर्गत पातळीवर जनतेचे मत जाणून घेण्यासाठी, बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा विकसित केल्याचे समोर आले होते. 1989 साली तिआनानमेन स्क्वेअरमध्ये घडलेल्या घटनेनंतर कम्युनिस्ट राजवटीने अशा प्रकारची यंत्रणा विकसित करण्यास सुरुवात केली होती.

2014 साली चीनच्या एका सरकारी दैनिकाने दिलेल्या वृत्तात, देशात 20 लाखांहून अधिक जण सरकारसाठी ‘पब्लिक ओपिनियन ॲनालिस्ट` म्हणून काम करीत असल्याचे सांगितले होते. 2018 साली एका सरकारी वृत्तसंस्थेने मत जाणून घेणे व बदलणे यासाठी सुरू असलेल्या मोहिमेसाठी सरकार अब्जावधी डॉलर्स खर्च करीत असल्याचा दावा केला होता. हेच मॉडेल आता चीनची कम्युनिस्ट राजवट देशाबाहेर राबवित असून त्यासाठी ‘डाटा सर्व्हिलन्स सिस्टिम` व ‘सोशल मीडिया`चा वापर सुरू असल्याचे ‘द वॉशिंग्टन पोस्ट`ने म्हटले आहे. देशांतर्गत पातळीवर वापरलेले मॉडेल चीन जागतिक पातळीवर राबविणार असेल तर तो मोठा धोका ठरतो, असे दावा विश्‍लेषकांनी बजावले आहे.

चीनच्या राजवटीकडून सुरू असणाऱ्या या मोहिमेची दखल सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्सनी घेतल्याचे संकेत मिळाले होते. 2020 सालच्या जून महिन्यात ट्विटरने कम्युनिस्ट राजवटीशी निगडित असलेले 23 हजार अकाऊंट्स बंद करण्याची कारवाई केली होती.

leave a reply