इस्रायल-इजिप्त-युएईच्या नेत्यांमध्ये इराणविरोधात सुरक्षा धोरणावर चर्चा

जेरूसलेम/कैरो/अबु धाबी – काही तासांपूर्वी इस्रायल, इजिप्त आणि युएईच्या नेत्यांची पार पडलेली बैठक लक्षवेधी ठरली. आर्थिक, ऊर्जा सहकार्याबरोबर या बैठकीत इराणचा वाढता धोका आणि संयुक्त सुरक्षा धोरण राबविण्यावर चर्चा पार पडली. इस्रायल आणि इजिप्त यांच्यात लष्करी व धोरणात्मक सहकार्य प्रस्थापित झालेले आहे. पण इजिप्तमधील या बैठकीच्या निमित्ताने इस्रायल व युएई यांच्यात लष्करी सहकार्य प्रस्थापित होत असल्याचा दावा आखातातील माध्यमे करीत आहेत.

इस्रायल-इजिप्त-युएईच्या नेत्यांमध्ये इराणविरोधात सुरक्षा धोरणावर चर्चाइजिप्तच्या शर्म अल-शेख येथे इस्रायल, इजिप्त व युएईच्या नेत्यांमध्ये पार पडलेल्या या बैठकीतून आखाती देशांच्या नव्या धोरणांचे संकेत मिळत आहेत. युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद यांच्या पुढाकाराने हे नवे धोरण आकार घेत असल्याचा दावा कैरो विद्यापीठाच्या राजशास्त्र विभागाचे विश्‍लेषक मुस्तफा कमाल अल-सय्यद यांनी केला. रशिया-युक्रेनमध्ये जवळपास महिनाभर सुरू असलेला संघर्ष आणि इराणबरोबर अणुकरार अंतिम टप्प्यात असताना ही बैठक पार पडली, याकडे अल-सय्यद यांनी लक्ष वेधले.

रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधनाचे दर कडाडले आहेत. त्याचबरोबर रशिया व युक्रेनकडून येणार्‍या गव्हावर अवलंबून असलेल्या देशांवर मोठे संकट कोसळले आहे. बायडेन प्रशासन वेगवेगळ्या मार्गाने इस्रायल तसेच युएईवर रशियाविरोधी भूमिका घेण्यासाठी दबाव टाकत आहेत. पण इस्रायल, युएई तसेच इजिप्तने या संघर्षात रशियाविरोधात भूमिका घेणे टाळले आहे. यासाठी बायडेन प्रशासनाची गेल्या वर्षभरातील भूमिका जबाबदार असल्याचा दावा आखाती माध्यमे करीत आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला बायडेन प्रशासनाने मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवून इजिप्तचे लष्करी सहाय्य रोखले होते. तर बायडेन प्रशासनाने इराणबाबत स्वीकारलेली भूमिका इस्रायल व युएईच्या संतापाचे कारण ठरल्याचा दावा आखाती माध्यमे करीत आहेत. इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्स तसेच हौथी व इतर इराणसंलग्न दहशतवादी संघटनांबाबत बायडेन प्रशासनाचे धोरण आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याची जाणीव इस्रायल व युएईला झाली आहे.

या पार्श्‍वभूमीवर इस्रायल, इजिप्त व युएईच्या नेत्यांची शर्म अल-शेखमध्ये झालेली भेट महत्त्वाची ठरते, असा दावा इस्रायली तसेच आखाती माध्यमे करीत आहेत. या भेटीद्वारे इस्रायल, इजिप्त व युएईने बायडेन प्रशासनाला संदेश दिल्याचे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. या बैठकीत संयुक्त सुरक्षा धोरणाबाबत झालेल्या चर्चेतून हेच संकेत मिळत असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, २०२० साली अब्राहम कराराअंतर्गत इस्रायल आणि युएईमध्ये सहकार्य प्रस्थापित झाले. येत्या काही आठवड्यात युएईचे शिष्टमंडळ इस्रायलला भेट देऊन मुक्त व्यापारी करार करणार आहेत. त्याआधी या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये संयुक्त सुरक्षा धोरणावर झालेली चर्चा म्हणजे इस्रायल व युएई यांच्यात लष्करी पातळीवरील सहकार्याची सुरूवात असल्याचा दावा इस्रायली विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply