भारतातून व्यापारी मालाची निर्यात पहिल्यांदाच ४०० अब्ज डॉलर्सवर

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उत्पादक व निर्यातदारांचे अभिनंदन

नवी दिल्ली – २२ मार्च रोजी चालू आर्थिक वर्षातील व्यापारी मालाच्या निर्यातीचा ४०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य भारताने गाठला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास नऊ दिवस शिल्लक असताना हे लक्ष्य गाठले गेले. देशात आतापर्यंत व्यापारी मालाची निर्यात कधीही ३५० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली नव्हती. या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योजक (एमएसएमई), उत्पादक, निर्यातदार अशा सर्वांचे अभिनंदन केले असून आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे अधोरेखित केले आहे.

यावर्षी व्यापारी मालाच्या निर्यात ४०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. १४ मार्च रोजी भारताची व्यापारी मालाची निर्यात ३९० अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती. त्यावेळी भारत ४०० अब्ज डॉलर्सचे लक्ष्य पूर्ण करण्यास लवकरच यशस्वी ठरेल, असे वाणिज्यमंत्री पियूष गोयल म्हणाले होते. त्यानंतर आठच दिवसाने भारताने एका वर्षात ४०० अब्ज डॉलर्सच्या व्यापारी मालाच्या निर्यातीचा टप्पा ओलांडला आहे. याची सरासरी काढल्यास यावर्षात प्रत्येक महिन्याला भारताने ३३ अब्ज डॉलर्सची निर्यात केली आहे.

सर्वच क्षेत्रातील निर्यात वाढली आहे. पेट्रोलियम उत्पादनापासून ईलेक्ट्रॉनिक वस्तू, अभियांत्रिकी उत्पादने, लेदर, कॉफी प्लास्टिक, रेडिमेड गार्मेंटसह इतर वस्त्रोउद्योगातून निर्यातीमध्ये चांगली वाढ झाली आहे. याशिवाय शेतीमाल, दूग्ध उत्पादने, मास, सागरी उत्पादने, तंबाखूची निर्यात वाढली आहे.

तेल, रत्न व ज्वेलरी व्यतिरिक्तच्या क्षेत्रात ३४ टक्क्यांची निर्यातवाढ झाली आहे. यामध्ये लोह व पोलाद क्षेत्रातील निर्यात (आयर्न व स्टील) गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत १० अब्जाने वाढली आहे. याशिवाय मशिनरी अर्थात यंत्रसामुग्री क्षेत्रातून ५.६ अब्ज, वाहन उद्योगातून ५.५ अब्ज, इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात ४.९ अब्ज इतकी वाढ नोंदविण्यात आली आहे. याशिवाय १४ क्षेत्रे अशी आहेत त्यामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत निर्यात एक अब्जाने वाढली आहे. यामध्ये जैविक रसायने, कापूस, धान्य, प्लास्टिक व मत्स उत्पादन क्षेत्राचा समावेश आहे.

२०२०-२१ या गेल्या आर्थिक वर्षात २२ मार्चपर्यंत व्यापारी मालाची निर्यात ही २९२ अब्ज डॉलर्स इतकी होती. याचा अर्थ यावर्षी निर्यातीमध्ये तब्बल ३७ टक्क्यांची वाढ झाली आहे. पहिल्यांदाच देशाने व्यापारी मालाच्या निर्यातीच्या बाबतीत ४०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. याआधी २०१८-१९ सालात ३३०.०७ अब्ज डॉलर्सची निर्यात भारतातून झाली होती. हा आतापर्यंतचा विक्रम होता.

गेल्या दोन वर्षात सर्व जगासमोर मोठी आव्हाने होती. कोरोनाच्या महासाथीचे महाभयानक संकटाने देशाला आणि जगाला ग्रासले होते. त्यामुळे सर्वच देशांच्या जीडीपीमध्ये मोठी घट झाली होती. भारतही याबाबतीत वेगळा नव्हता. या संकाटातून नि

र्माण झालेले पुरवठा साखळीचे संकट, कंटेनर तुटवडा, बाजारातील तरलतेची समस्या आणि आता रशिया-युक्रेन युद्ध अशा कितीतरी गोष्टींवर मात करीत भारताने निर्यातीचा ४०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे, याकडे वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी लक्ष वेधले आहे.

‘फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन’चे (एफआयईओ) महासंचालक अजय सहाई यांनीही अनेक अडथळ्यांवर मात करीत भारतातील निर्यात वाढल्याचे अधोरेखित केले. एका वर्षात व्यापारी मालाच्या निर्यातीत सुमारे ११० अब्ज डॉलर्सची वाढ उल्लेखनीय कामगिरी ठरते, असे सहाई म्हणाले. तसेच नवे झालेले व होऊ घातलेले व्यापारी करार याचा लाभ येत्या काळात मिळेल. तसेच भारत सरकारच्या ‘प्रॉडक्शन लिंक इन्सेंटिव्ह’चे (पीएलआय) मोठे पाठबळ उद्योगक्षेत्राला मिळत असल्याचे सहाई यांनी ठळकपणे सांगितले.

leave a reply