इस्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्ष भडकण्याच्या स्थितीत आहे

- संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेषदूतांचा इशारा

संघर्ष भडकण्याच्या स्थितीतन्यूयॉर्क – ‘गेल्या काही महिन्यांपासून वेस्ट बँकमध्ये इस्रायली आणि पॅलेस्टिनींवरील हल्ल्यांमध्ये झालेली वाढ अतिशय चिंताजनक बाब ठरते. इस्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्ष भडकण्याच्या स्थितीत आला आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने वेळीच कारवाई केली नाही तर आर्थिक, राजकीय आणि सुरक्षेच्या दृष्टीने या संघर्षावर नियंत्रण मिळविणे अवघड होऊन बसेल’, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने नियुक्त केलेले विशेषदूत तोर वेनीसलँड यांनी दिला. इस्रायल व पॅलेस्टाईनमधली रखडलेली शांतीचर्चा हे या वाढत्या हिंसाचारामागील प्रमुख कारण असल्याचा दावा वेनीसलँड यांनी केला.

गेल्याच आठवड्यात जेरूसलेम शहर दुहेरी बॉम्बस्फोटांनी हादरले. या स्फोटात बळी गेलेल्या दोन इस्रायलींमध्ये १५ वर्षाच्या मुलाचा समावेश होता. वेस्ट बँकमधील हमास व इस्लामिक जिहादचा प्रभाव असलेल्या कट्टरपंथियांनी हे हल्ले चढविल्याचा दावा केला जात होता. यानंतर इस्रायली सुरक्षा यंत्रणांनी प्रत्युत्तरादाखल वेस्ट बँकमध्ये कारवाई केली होती. या स्फोटानंतर इस्रायल व वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींनी इस्रायलींवर चढविलेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित झाला होता.

या वर्षी इस्रायल तसेच वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टिनींनी केलेल्या हल्ल्यांमध्ये ३० जणांचा बळी गेल्याचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे. काही महिन्यांपूर्वी इस्रायली पोलिसांनी वेस्ट बँकमध्ये दहशतवादविरोधी मोहीम छेडली होती. यामध्ये १३० पॅलेस्टिनींचा बळी गेला तर दोन हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले होते. इस्रायलने वेस्ट बँकमध्ये केलेल्या कारवाईवर जगभरातून प्रतिक्रिया आल्या होत्या. संयुक्त राष्ट्रसंघाने पॅलेस्टाईनसाठी नियुक्त केलेले विशेषदूत तोर वेनीसलँड यांनी इस्रायल व पॅलेस्टिनींवर वाढलेल्या हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली. इस्रायल, वेस्ट बँकमधील हल्ल्यांमुळे काही गंभीर बाबी समोर आल्याचे वेनीसलँड यांनी निदर्शनास आणून दिले. वेस्ट बँकमध्ये शस्त्रास्त्रांचा वापर वाढला असून निर्वासितांवरील हल्ल्यांमध्ये देखील वाढ झाल्याचा दावा वेनीसलँड यांनी केला. या प्रकारच्या घटनांमध्ये नागरिकांवरील हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचे राष्ट्रसंघाच्या राजदूतांनी बजावले.

या संघर्षामुळे स्थैर्य आणि सुरक्षेला असलेला धोका वाढला असून हे कोणासाठीही चांगले ठरणार नाही, असे वेनीसलँड म्हणाले. त्याचबरोबर गाझापट्टी आणि वेस्ट बँकमधील वेगाने वाढत असलेली जनसंख्या देखील चिंतेचे कारण असल्याचा दावा राजदूत वेनीसलँड यांनी केला. गाझा व वेस्ट बॅँकमधील लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत जाईल त्याच प्रमाणात हा संघर्ष हाताळणे देखील अवघड बनेल, असे वेनीसलँड म्हणाले.

अशा परिस्थितीत, इस्रायलमधील बेंजामिन नेत्यान्याहू यांचे नवे सरकार पॅलेस्टिनींबरोबर रखडलेली शांतीचर्चा सुरू करण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास वेनीसलँड यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाने देखील इस्रायल व पॅलेस्टिनींमधील हा संघर्ष सोडविण्यासाठी वेळीच दखल द्यावी, असे आवाहन वेनीसलँड यांनी केले. अन्यथा येत्या काळात आर्थिक, राजकीय व सुरक्षेच्या दृष्टीने इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर नियंत्रण ठेवता येणार नाही, असा इशारा वेनीसलँड यांनी दिला.

दरम्यान, बेन-ग्वीर या जहाल इस्रायली नेत्यांना बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. ही बाब पॅलेस्टाईनमधल्या कट्टरपंथियांसह अमेरिकेच्या बायडेन प्रशासनालाही मान्य नाही. म्हणूनच बेन-ग्वीर यांना मंत्रीपद मिळू नये, यासाठी बायडेन प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्याचवेळी बेंजामिन नेत्यान्याहू यांनी जहाल धोरणे न स्वीकराता पॅलेस्टिनींशी चर्चा करावी, यासाठी बायडेन प्रशासन वेगवेगळ्या मार्गाने दबाव टाकत असल्याचे दिसू लागले आहे.

leave a reply