इराण, हिजबुल्लाहची कड घेणाऱ्या रशियाच्या राजदूतांना इस्रायलने खडसावले

इस्रायलने खडसावलेजेरूसलेम – आखातातील तणावासाठी इराण नाही तर इस्रायल जबाबदार असल्याचा दावा करणारे रशियन राजदूत अँटोली विक्टोरोव्ह यांना इस्रायलने खडसावले आहे. रशियन राजदूतांची प्रतिक्रिया मर्यादा ओलांडणारी आणि आखातातील वास्तवाशी विसंगत होती, याची जाणीव इस्रायलने करुन दिली. इस्रायलच्या या भूमिकेमुळे सावध झालेल्या रशियन राजदूतांनी आपल्या प्रतिक्रियेचा संबंधित वर्तमानपत्राने विपर्यास केल्याचा खुलासा दिला. तसेच याचा इस्रायल आणि रशियातील संबंधावर परिणाम होणार नसल्याची अपेक्षाही व्यक्त केली.

इस्रायलमधील रशियाचे राजदूत व्हिक्टोरोव्ह यांनी दोन दिवसांपूर्वी इस्रायलमधील एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत, आखातातील तणावासाठी इराण नाही तर इस्रायल जबाबदार असल्याचा दावा केला होता. इस्रायली लष्कराकडून सिरियात होत असलेले हल्ले, येथील इराणच्या लष्करी तळांवर आणि हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्रांच्या गोदामांवरील हल्ले आखातातील तणावात भर टाकत असल्याचे व्हिक्टोरोव्ह यांनी म्हटले होते. ‘इस्रायलच हिजबुल्लाहवर हल्ले चढवित असून, हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ले देखील चढविलेले नाहीत. संयुक्त राष्ट्रसंघाचा सार्वभौम सदस्य असलेल्या सिरियावर इस्रायलने हल्ले चढवू नये’, असे व्हिक्टोरोव्ह म्हणाले होते.

इस्रायलने खडसावलेरशियन राजदूतांच्या या मुलाखतीवर इस्रायलमधून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने रशियन राजदूत व्हिक्टोरोव्ह यांना समन्स बजावले. इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील राजकीय धोरणांचे संचालक एलोन बार यांनी रशियाच्या राजदूतांना चांगलेच खडसावल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. ‘इराण आणि इराणसंलग्न दहशतवादी संघटना, प्रामुख्याने हिजबुल्लाहपासून इस्रायलला असलेला धोका वास्तववादी आहे. असत्य विधाने करुन चिथावणी देण्यापेक्षा इस्रायलला असलेल्या धोक्याविषयी द्विपक्षीय चर्चा करण्याची आवश्‍यकता आहे’, असे बार यांनी सुनावले.

इस्रायलने खडसावले

इस्रायलच्या या कठोर भूमिकेमुळे खडबडून जागा झालेल्या रशियन राजदूत व्हिक्टोरोव्ह यांनी याप्रकरणी सारवासारव सुरू केली आहे. इस्रायली वर्तमानपत्राने आपल्या तोंडी वाक्य घुसविल्याचा दावा व्हिक्टोरोव्ह यांनी केला. तसेच आपण केलेल्या विधानांचा विपर्यास केल्याचेही व्हिक्टोरोव्ह यांनी म्हटले आहे. यासाठी इस्रायली वर्तमानपत्राकडून आपण खुलासा मागितल्याचेही व्हिक्टोरोव्ह यांनी सांगितले. तर इस्रायली वर्तमानपत्राने रशियन राजदूतांवरच डाव उलटवला आहे. रशिया म्हणजे वास्तवाची जाणीव नसलेला आयर्लंड किंवा स्विडन नाही, असा खोचक टोला इस्रायली वर्तमानपत्राने लगावला.

leave a reply