इस्रायल सौदीसह आखाती देशांना लेझर डोम पुरविणार

- इस्रायल बायडेन प्रशासनाकडून परवानगी घेणार

लेझर डोमजेरूसलेम/वॉशिंग्टन – इस्रायलने सौदी अरेबियासह अरब देशांना सुरक्षेसाठी लेझर हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविण्याची तयारी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या दौऱ्यात इस्रायल यासंबंधीची मागणी करणार असल्याची बातमी इस्रायली वृत्तवाहिनीने दिली. तर इराणविरोधात संयुक्त लष्करी सहकार्याबाबत इस्रायल व सौदीमध्ये छुपी बैठक पार पडल्याचा दावा अमेरिकेच्या वृत्तपत्राने केला आहे.

येत्या महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इस्रायल व सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर येत आहेत. युएई, बाहरिन यांच्याप्रमाणे इतर आखाती देशांनी देखील इस्रायलबरोबरच्या अब्राहम करारात सहभागी व्हावे, यासाठी बायडेन प्रयत्न करणार असल्याचा दावा केला जातो. तर इस्रायलचे नेते इराणविरोधी आघाडीसाठी प्रयत्न करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. इस्रायलमधील ‘चॅनल 12′ या आघाडीच्या वृत्तवाहिनीने याबाबत मोठा दावा केला.

येत्या काळात इराणने हल्ले चढविलेच आखाती देशांच्या सुरक्षेसाठी इस्रायल हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविणार आहे. युएई, बाहरिन या देशांबरोबरच सौदी अरेबिया, इजिप्त, जॉर्डन आणि कतार या देशांना इस्रायल सदर यंत्रणा पुरविण्यास तयार असल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. इस्रायल आखाती देशांना ‘आयर्न बिम’ अर्थात ‘लेझर डोम’ पुरवू शकतो, असे वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे.

साधारण दीड वर्षांपूर्वी इस्रायलने युएई व बाहरिन या देशांबरोबर अब्राहम करार केला. तर इजिप्त व जॉर्डन या शेजारी देशांबरोबर इस्रायलचे आधीपासून सहकार्य आहे. त्यामुळे सौदी व कतार या दोन आखाती देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित इस्रायलचे प्रयत्न सुरू आहेत. असे झाले तर इस्रायल क्षेत्रीय आखाती देशांबरोबर इराणविरोधात हवाई सुरक्षा यंत्रणा उभारण्यात यशस्वी होईल, असा दावा या वृत्तवहिनीने केला.

इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या विधानांचा दाखला सदर वृत्तवाहिनीने दिला. ‘सुरक्षित, स्थिर आणि समृद्ध आखातासाठी इस्रायल या क्षेत्रातील सहकारी देशांसह इतर देशांशीही सहकार्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये हवाई सुरक्षा यंत्रणेचाही समावेश होतो. यासाठी बायडेन यांच्या आखात दौऱ्याची प्रतिक्षा करीत आहोत. कदाचित इराणच्या आक्रमकतेविरोधात आवश्यक मार्ग निघेल’, असे गांत्झ यांनी पक्षांतर्गत कार्यक्रमात म्हटले होते. त्यामुळे इस्रायल सौदीसह आखाती देशांना लेझर हवाई सुरक्षा यंत्रणा पुरविणार असल्याच्या बातमीचे गांभीर्य वाढले आहे.

अमेरिकेतील ‘द वॉल स्ट्रिट जर्नल’ या आघाडीच्या वृत्तपत्राने इस्रायल व सौदीतील सहकार्याबाबत नवा दावा केला. मार्च महिन्यात इस्रायल, सौदी, युएई, बाहरिन, इजिप्त, जॉर्डन व कतारच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. अमेरिकेचे तत्कालिन सेंटकॉमप्रमुख जनरल फ्रँक मॅकेन्झी यांच्या उपस्थितीत इस्रायल, सौदीसह अरब देशांच्या या बैठकीत इराणविरोधी सुरक्षा आघाडीवर चर्चा झाल्याचे अमेरिकेच्या वृत्तपत्राने म्हटले आहे.

दरम्यान, याआधीही इस्रायलने सौदीबरोबर अब्राहम करार शक्य असल्याचे म्हटले होते. तर इस्रायल हा आपला शत्रूदेश नसल्याची घोषणा सौदीने केली होती.

leave a reply