बारा वर्षांच्या तणावानंतर इस्रायल-तुर्की पुन्हा राजनैतिक संबंध प्रस्थापित करणार

राजनैतिक संबंधजेरूसलेम – सर्व धर्मांनी एकमेकांशी शांततेने राहिले पाहिजे, असे आवाहन करून इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयसॅक हर्झोग यांनी इस्रायल आणि तुर्की राजनैतिक संबंध पूर्ववत करीत असल्याची घोषणा केली. तुर्कीबरोबरचे संबंध नव्याने प्रस्थापित होणे या क्षेत्राच्या स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. या प्रयत्नांची पहिली पायरी म्हणून उभय देशांमधील दूतावास सुरू करणार असल्याचे दोन्ही देशांनी जाहीर केले. तब्बल बारा वर्षांच्या तणावानंतर इस्रायल व तुर्कीतील संबंधात होणारी सुधारणा ही लक्षणीय बाब ठरते.

दशकभरापूर्वी इस्रायल आणि तुर्कीमध्ये मैत्रीपूर्ण सहकार्य होते. पण २०१० साली तुर्कीने गाझापट्टीतील पॅलेस्टिनींसाठी सहाय्याने भरलेले जहाज रवाना केले होते. हे जहाज गाझातील हमासच्या दहशतवाद्यांना सहाय्य पुरवीत असल्याचा आरोप करून इस्रायलच्या नौदलाने या जहाजावर कारवाई केली होती. यात तुर्कीचे आठ जण ठार झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इस्रायलबरोबरच्या सर्वप्रकारच्या सहकार्यातून माघार घेतली होती. तसेच इस्रायलविरोधी गटांना उघड सहकार्य करण्यास सुरुवात केली होती.

अमेरिका व इस्रायलने दहशतवादी संघटना घोषित केलेल्या हमासच्या नेत्यांची एर्दोगन यांनी भेट घेतली होती. अगदी दोन वर्षापूर्वीपर्यंत तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलच्या जेरूसलेमवर तुर्कांचा अधिकार असल्याचा दावा ठोकला होता. तसेच तुर्कीचे लष्कर लवकरच जेरूसलेम इस्रायलपासून मुक्त करील, अशा धमक्या एर्दोगन यांनी दिल्या होत्या. होते. पण गेल्या दोन वर्षांमध्ये तुर्कीची अर्थव्यवस्था ढेपाळली आहे. त्याचबरोबर एकेकाळी अमेरिका, युरोपिय देश आणि सौदी अरेबियाशी चांगले संबंध असलेला तुर्की आता आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडला आहे.

आपल्या देशाच्या या दुरावस्थेसाठी राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचे कट्टरवादी नेतृत्व जबाबदार असल्याची टीका तुर्कीमध्ये जोर पकडत आहे. याचा फायदा एर्दोगन यांच्या राजकीय विरोधकांना मिळू लागला होता. यामुळे सावध झालेल्या राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी तुर्कीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि स्वत:ची प्रतिमा सुधारण्यासाठी गेल्या वर्षभरापासून जुन्या सहकारी देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलली आहेत. यासाठी तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी काही महिन्यांपूर्वी सौदी अरेबियाच्या नेत्यांसह अरब-आखाती देशांच्या नेत्यांचीही भेट घेतली होती. याबरोबरच तुर्कीने इस्रायलबरोबर पुन्हा सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी धडपडत सुरू केली होती.

राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या या प्रयत्नांना यश मिळू लागले आहे. बुधवारी इस्रायलने तुर्कीबरोबर नव्याने सहकार्य प्रस्थापित केले जाईल, असे जाहीर केले. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड आणि तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांची फोनवरून चर्चा पार पडली. लवकरच दोन्ही देश परस्परांच्या देशांमधील आपले दूतावास सुरू करून राजदूतांची नियुक्तीही करतील. गाझापट्टीतून हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांचे हल्ले वाढत असताना आणि त्यांच्यावरील इस्रायलची कारवाई तीव्र होत असताना, इस्रायल व तुर्कीमध्ये प्रस्थापित झालेले हे सहकार्य लक्ष वेधून घेणारे ठरत आहे.

leave a reply