इस्रायल-युएईमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापारी करारावर स्वाक्षर्‍या

मुक्त व्यापारीजेरूसलेम – इस्रायल आणि युएईमधील सहकार्य नवनवी उंची गाठत आहे. इस्रायल व युएईतील अब्राहम कराराला दीड वर्षे पूर्ण होत दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापारी करार पार पडला. इस्रायल व युएईतील सहकार्याचा हा एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे इस्रायलने म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या प्रमुखांनी अरब देशांनी इस्रायलबरोबरचे सहकार्य तोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर इस्रायल व युएईमध्ये झालेला हा मुक्त व्यापारी करार इराणसाठी इशारा ठरतो.

२०२० साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्रायल आणि युएईमध्ये अब्राहम करार झाला होता. त्यानंतर उभय देशांनी परस्पर व्यापारी सहकार्य प्रस्थापित केले. २०२१ साली इस्रायल व युएईतील व्यापार ९० कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी सहकार्यातील ही पहिली व मोठी झेप असल्याचा दावा आखाती माध्यमे करीत आहेत.

या सहकार्याचा पुढचा टप्पा म्हणून इस्रायल व युएईच्या नेत्यांमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून मुक्त व्यापारी करारावर चर्चा सुरू होती. हा मुक्त व्यापारी करारातील अटींसाठी दोन्ही देशांमध्ये तीन बैठका पार पडल्या होत्या. मंगळवारी जेरूसलेममध्ये इस्रायलच्या अर्थमंत्री ओरना बारबियावी आणि युएईचे व्यापारमंत्री थानी बिन अहमद अल झेयोदी यांच्यात चौथी व अंतिम चर्चा झाली. यानंतर शुक्रवारी उभय देशांमधील मुक्त व्यापारी करारावर स्वाक्षर्‍या झाल्या.

इस्रायल व युएईतील हा मुक्त व्यापारी करार म्हणजे ऐतिहासिक बाब असल्याचे ओरना बारबियावी यांनी म्हटले आहे. यामुळे उभय देशांमधील उद्योगसमुहातील परस्पर सहकार्य वाढेल, असा विश्‍वास ओरना यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षभरात इस्रायल आणि युएईमध्ये झालेल्या एकूण व्यापारापैकी ९५ टक्के मालावर सीमाशुल्क माफ करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार येत्या काळात अधिक सहज होईल, असा दावा केला जातो.

गेल्या महिन्याच्या अखेरीस इजिप्तच्या शर्म अल-शेखमध्ये इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद अल नह्यान यांच्यात चर्चा पार पडली होती. त्यानंतर या मुक्त व्यापारी कराराला गती मिळाल्याची चर्चा आखाती माध्यमांमध्ये आहे. इस्रायल व युएई तसेच इतर अरब देशांमधील वाढत्या सहकार्यामुळे इराणची बेचैनी वाढल्याच्या बातम्या येत आहेत.

दोन दिवसांपूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख सलामी यांनी इस्रायलशी सहकार्य करणार्‍या अरब देशांना धमकावले होते. सर्व अरब देशांनी इस्रायलबरोबरचे सहकार्य तोडावे, असे आवाहन रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या प्रमुखांनी केले होते. अन्यथा इस्रायलबरोबरच्या या सहकार्याचे चांगले परिणाम होणार नसल्याचा इशारा इराणने दिला होता. त्यामुळे या नव्या सहकार्यावर इराणकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

leave a reply