अझरबैजान आर्मेनियावर मोठ्या हल्ल्याची तयारी करीत आहे

- अर्मेनियाच्या पंतप्रधानांचा आरोप

मोठ्या हल्ल्याची तयारीयेरेवन – रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा अझरबैजान फायदा घेत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहेत. काही दिवसांपूर्वी अझरबैझानने पुन्हा एकदा आर्मेनियाच्या जवानांवर गोळीबार केला होता. यानंतर रशियाने अझरबैजानवर संघर्षबंदीचा भंग केल्याचा आरोप केला. पण यानंतरही आपल्या शेजारी देशाच्या आक्रमक हालचाली थांबलेल्या नसून अझरबैजान आर्मेनियावर मोठा हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याचा आरोप आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिनिआन यांनी केला.

अझरबैजान नागोर्नो-काराबाख आणि आर्मेनियावर हल्ला चढवून जाहीररित्या युद्ध छेडण्याच्या तयारीत असल्याचा ठपका पंतप्रधान निकोल पशिनिआन यांनी ठेवला. ‘१९९२ साली मिंस्क येथे झालेला कराराचा आदर करून आर्मेनियाने अझरबैजानला पाच कलमी शांतीप्रस्ताव दिला होता. पण अझरबैजानने हा शांतीप्रस्ताव केराच्या टोपलीत टाकून कुठल्याही कराराचे पालन करणार नसल्याचा इशारा दिला आहे’, अशी माहिती आर्मेनियाचे पंतप्रधान पशिनिआन कॅबिनेट बैठकीत दिली.

अझरबैजानने शांतीप्रस्ताव धुडकावणे आणि तीस वर्षांपूर्वी कराराचे पालन न करण्याची घोषणा करणे म्हणजे आर्मेनिया तसेच नागोर्नो-काराबाखवरील मोठ्या हल्ल्याची तयारी असल्याचा दावा पशिनिआन यांनी केला. रशिया सध्या युक्रेनच्या युद्धात गुंतलेला आहे, याची संधी साधून अझरबैजान हा हल्ला चढवू शकतो, अशी शक्यता पशिनिआन यांनी वर्तविली. काही दिवसांपूर्वी रशियन माध्यमांनी देखील अझरबैजान युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फायदा घेत असल्याचा आरोप केला होता.

गेल्या आठवड्यात अझरबैजानच्या लष्कराने नागोर्नो-काराबाखमधील फारुख नावाच्या गावात प्रवेश करून त्यावर ताबा मिळविला होता. त्यापाठोपाठ ‘काराग्लुख हाईट’ या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागावरही नियंत्रण मिळविल्याचे समोर आले होते. या भागात रशियन शांतीसैनिक तैनात असतानाही अझरबैजानने ही अरेरावी करून आपले इरादे स्पष्ट केले होते. अझरबैजानच्या या हल्ल्यांनंतर आर्मेनियाने रशियाशी सल्लामसलत केली होती. राष्ट्राध्यक्ष पशिनिआन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती.

नागोर्नो-काराबाखमध्ये अझबैजानने संघर्षबंदीचा भंग केला. यावेळी अझेरी लष्कराकडून हल्ल्यांसाठी तुर्की ड्रोन्सचा करण्यात आलेला वापर चिंताजनक असल्याची टीका रशियन संरक्षण मंत्रालयाने केली होती. पण रशियाच्या या टीकेकडे अझरबैजान दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर अझरबैजानने युरोपिय महासंघाबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी हालचाली वाढविल्याच्या बातम्या येत आहेत.

leave a reply