हमासची माहिती मिळविण्यासाठी इस्रायलने ‘ड्रोन स्वार्म’ वापरले – ब्रिटनमधील मासिकाचा दावा

लंडन – मे महिन्यामध्ये 11 दिवसांचा हमासबरोबरील संघर्ष म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे लढलेले जगातील पहिले युद्ध होते, अशी घोषणा इस्रायलच्या लष्करी अधिकार्‍यांनी महिन्याभरापूर्वी केली होती. याबरोबर लष्करी तंत्रज्ञानात आपण फार मोठी प्रगती केल्याचा इशारा इस्रायलने आपल्या शत्रूंना दिला होता. आता याच 11 दिवसांच्या युद्धात हमासच्या दहशतवाद्यांवर हल्ले चढविण्याच्या आधी आवश्यक असलेली माहिती मिळविण्यासाठी इस्रायलने ड्रोन स्वार्म्सचा वापर केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे इस्रायल-हमासमध्ये जगातील पहिला एआय नियंत्रित ड्रोन स्वार्म्सचा संघर्ष झाल्याचा दावा लंडनस्थित मासिकाने केला.

‘ड्रोन स्वार्म’इस्रायली लष्कर आणि गाझातील हमासचे दहशतवादी यांच्यात मे महिन्यात मोठा संघर्ष पेटला होता. यामध्ये हमासने इस्रायलवर तब्बल 4,300 रॉकेट्स, क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. तर इस्रायली लष्कराने हवाई कारवाईने हमासला उत्तर दिले होते. या संपूर्ण संघर्षात गाझातील 256 तर इस्रायलमधील 13 जण ठार झाले. गाझातील कारवाईत हमासच्या दीडशेहून अधिक दहशतवादी ठार केल्याचा दावा इस्रायलने केला होता. इस्रायल आणि हमासमधील हा आत्तापर्यंतचा सर्वात भीषण संघर्ष मानला जातो.

या संघर्षात हमासच्या दहशतवाद्यांची छुपी ठिकाणे शोधण्यासाठी इस्रायलने ड्रोन स्वार्म्सचा वापर केला होता. ‘न्यू सायन्टिस्ट’ या लंडनस्थित मासिकाने हा दावा केला आहे. अशा प्रकारे एआयवर आधारीत ड्रोन स्वार्म्सचा वापर करण्याची ही पहिली वेळ असल्याचे या मासिकाचे म्हणणे आहे. आत्तापर्यंत अमेरिकेने इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, सिरिया, येमेन, सोमालिया या देशांमध्ये दहशतवाद्यांवरील हल्ल्यांसाठी मोठ्या आकाराच्या ड्रोन्सचा वापर केला होता. या ड्रोन्सना दुसर्‍या देशात बसलेल्या वैमानिकांद्वारे संचलित केले जाते. पण इस्रायलने हमासच्या दहशवाद्यांची माहिती मिळविण्यासाठी वापरलेले ड्रोन स्वार्म्स एआय तंत्रज्ञानावर आधारित होते, अशी माहिती सदर मासिकाने दिली.

‘ड्रोन स्वार्म’या संघर्षात इस्रायलच्या ड्रोन स्वार्म्सनी हल्ले चढविले की त्यांचा वापर केवळ माहिती मिळविण्यासाठीच झाला, ते स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण हमासच्या दहशतवाद्यांची अचूक माहिती गोळा करून लष्करी यंत्रणांना पुरविण्याची कामगिरी या ड्रोन स्वार्म्सनी पार पाडल्याचे या मासिकाने म्हटले आहे. यामुळे हमासच्या दहशतवाद्यांवर हल्ले चढविणे इस्रायलला सोपे गेल्याचा दावा मासिकाने केला. याबाबत इस्रायली लष्कराने अधिकृत स्तरावर कसलेही तपशील जाहीर केलेले नाही.

‘इस्रायलने हमासविरोधी कारवाईत ड्रोन स्वार्म्सचा वापर केवळ माहिती मिळविण्यासाठी केलेला असेल, तरीही पुढच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेले हे ड्रोन स्वार्मस् युद्धतंत्रात फार मोठे बदल घडविणारे ठरतील’, अशी चिंता संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘इन्स्टिट्युट फॉर डिसआर्मामेंट रिसर्च’ विभागाचे विश्‍लेषक आर्थर हॉलंड यांनी व्यक्त केली. याआधी अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी ड्रोन स्वार्म्सवर वेगाने काम सुरू केल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण याचा वापर सुरू झाल्याचे जाहीर करून ‘न्यू सायन्टिस्ट’ने चिंता वाढविल्या आहेत.

leave a reply