इंधनवाहू जहाजावर हल्ले चढविणार्‍या इराणला उत्तर देण्याचा इस्रायलचा इशारा

- अमेरिका, ब्रिटनचे इस्रायलला समर्थन

इंधनवाहू जहाजावरजेरूसलेम/वॉशिंग्टन/लंडन – ‘इस्रायली इंधनवाहू जहाजावर आत्मघाती ड्रोन्सचे हल्ले चढविणार्‍या इराणला कसे उत्तर द्यायचे हे इस्रायलला बरोबर ठाऊक आहे’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला. आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रातील वाहतूक धोक्यात टाकणार्‍या इराणवरील इस्रायलला अमेरिका आणि ब्रिटनने देखील समर्थन जाहीर केले. तर इराणने इस्रायलच्या हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली.

गेली दीड वर्षे इस्रायल आणि इराण यांच्यात आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रात अघोषित संघर्ष सुरू आहे. हिंदी महासागर क्षेत्रापासून ते भूमध्य सागरी क्षेत्रापर्यंतच्या पट्ट्यात प्रवास करणार्‍या एकमेकांच्या मालवाहू तसेच इंधनवाहू जहाजांवर इस्रायल व इराणने छुपे हल्ले चढविले. आत्तापर्यंत या हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाली नव्हती. पण गेल्या आठवड्यात ओमानच्या सागरी क्षेत्राजवळून आखातासाठी प्रवास करणार्‍या ‘मर्सर स्ट्रीट’ इंधनवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यात दोन कर्मचार्‍यांचा बळी गेल्यानंतर इथला तणाव वाढला.

या इंधनवाहू जहाजाची मालकी जपानच्या कंपनीकडे आहे. तर लंडनस्थित इस्रायली कंपनीकडे या जहाजाच्या ऑपरेशन्सची जबाबदारी आहे. पण मर्सर स्ट्रीट जहाजावर झालेल्या आत्मघाती ड्रोन्सच्या हल्ल्यात ब्रिटिश व रोमानियन नागरिकांचा बळी गेल्यानंतर इस्रायलने याची गंभीर दखल घेतली. इराणने या इंधनवाहू जहाजावर हल्ले केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनट यांनी जाहीर केले.

‘इराणला इस्रायली हितसंबंधांना लक्ष्य करायचे असून मर्सर स्ट्रीटव हल्ला चढवून इराणने तेच केले. पण इंधनवाहू जहाजावरील हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय हितसंबंध, सागरी स्वातंत्र्य आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी धोका ठरतो. इराणच्या या हल्ल्यांना कसे उत्तर द्यायचे हे इस्रायलला बरोबर ठाऊक आहे’, असे बेनेट यांनी रविवारच्या कॅबिनेट बैठकीनंतर जाहीर केले.

ओमानच्या सागरी क्षेत्राजवळ इंधनवाहू जहाजावर ड्रोन्सचे हल्ले चढविणार्‍या इराणवर अमेरिका आणि ब्रिटनने टीका केली. ‘इराणनेच हा हल्ला चढविला, असा अमेरिकेला विश्‍वास आहे. हाती असलेल्या माहितीच्या आधारावर अमेरिका या निष्कर्षावर पोहोचला असून या हल्ल्यासाठी इराणला योग्यवेळी प्रत्युत्तर मिळेल’, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी स्पष्ट केले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा इस्रायलला पूर्ण अधिकार असल्याचे जेरूसलेममधील अमेरिकेचे उपराजदूत मार्क पॉवर यांनी म्हटले आहे. तर ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांनी देखील इस्रायली इंधनवाहू जहाजाला जाणुनबुजून लक्ष्य करून इराणने आंतरराष्ट्रीय सागरी नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला.

दरम्यान, इस्रायलचा इशारा व त्याला अमेरिका आणि ब्रिटनने समर्थन दिल्यानंतर, इराणने आपल्या विरोधातील संभाव्य कारवाईला जबरदस्त प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली. तसेच मर्सर स्ट्रीटवरील हल्ल्याचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचे इराणने म्हटले आहे. याउलट इस्रायलच या क्षेत्रातील दहशतवाद आणि अस्थैर्यासाठी जबाबदार असल्याचा ठपका इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ठेवला.

leave a reply