हमासच्या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलचे गाझापट्टीवर हवाई हल्ले

जेरूसलेम – इस्रायलमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीची संधी साधून हमासने इस्रायलच्या दक्षिणेकडील भागावर रॉकेट हल्ला चढविला होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू दक्षिणेकडील भागाच्या दौर्‍यावर असताना हमासने हा रॉकेट हल्ला चढवून इस्रायलला चिथावणी दिली होती. त्यानंतर इस्रायलने हवाई हल्ले चढवून गाझातील हमासचे लष्करी तळ आणि रॉकेट तयार करणार्‍या कारखान्यांना लक्ष्य केले.

मंगळवारी इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणूक पार पडली. इस्रायलमध्ये गेल्या दोन वर्षात इस्रायलमध्ये चौथ्यांदा निवडणूक संपन्न झाली आहे. जवळपास ८८ टक्के इस्रायली जनतेने या मतदानात सहभाग?घेतल्याचा दावा केला जातो. इस्रायली जनतेने यात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, यासाठी विद्यमान पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी मंगळवारी संध्याकाळी दक्षिणेकडील बिरशेबा शहराचा दौरा केला होता. त्यासुमारास गाझापट्टीतून इस्रायलच्या दक्षिणेकडील भागात रॉकेट हल्ला झाला.

इस्रायलच्या लष्कराने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सदर रॉकेट मोकळ्या मैदानात कोसळले. या हल्ल्यात कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही. पण या रॉकेट हल्ल्यामुळे नेत्यान्याहू यांची बैठक प्रभावित झाली. सुरक्षा रक्षकांनी पंतप्रधान नेत्यान्याहू यांना सुरक्षितरित्या इथून बाहेर काढले. गेल्या दोन वर्षात नेत्यान्याहू यांच्या निवडणूक प्रचाराला लक्ष्य करून दहशतवाद्यांनी घडविलेला हा तिसरा हल्ला ठरतो. इस्रायलमध्ये मतदान सुरू असताना रॉकेट हल्ला चढवून हमासने तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप इस्रायली माध्यमे करीत आहेत.

पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा बिरशेबाचा दौरा पूर्ण होताच इस्रायलच्या लष्कराने रॉकेट हल्ल्याला उत्तर देणारी कारवाई केली. गाझापट्टीतील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसर, मंगळवारी मध्यरात्रीनंतर २ वाजून ३० मिनिटांनी इस्रायलची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर्सनी दक्षिण गाझामध्ये किमान आठ ठिकाणी हल्ले चढविले. यामध्ये हमासने उभारलेल्या रॉकेट तयार करणार्‍या कारखान्याचा समावेश आहे. या व्यतिरिक्त हमासच्या सशस्त्र गटाच्या सुरक्षा चौकीलाही इस्रायली हवाई हल्ल्यांनी लक्ष्य केले.

इस्रायली लष्कराच्या या हल्ल्यात हमासचे मोठे नुकसान झाल्याचा दावा स्थानिक करीत आहेत. पण हमासने याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या काही आठवड्यांपासून हमास व इस्लामिक जिहादचे दहशतवादी व समर्थकांनी इस्रायलच्या सीमेतील बलुन तसेच काईट बॉम्बचे हल्ले करीत आहेत. या हल्ल्यांमध्ये इस्रायलच्या सीमेवरील शेतांचे नुकसान होत असल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी गाझातील दहशतवादी संघटनांच्या रॉकेट हल्ल्यांचा धोका वाढत असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे.

गेल्या आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान युएईच्या ऐतिहासिक दौर्‍यावर जाणार होते. पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्या या दौर्‍याची तयारीही झाली होती. पण अंतिम क्षणी नेत्यान्याहू यांचा सदर दौरा रद्द करण्यात आला होता. येमेनमधील हौथी बंडखोरांकडून सौदी अरेबियावर होणार्‍या रॉकेट हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान नेत्यान्याहू यांना सदर दौरा रद्द करावा लागल्याचा दावा करण्यात आला होता. कारण युएई भेटीसाठी पंतप्रधान नेत्यान्याहू सौदीच्या हवाईहद्दीचा वापर करणार होते. पण गाझातील दहशतवादी संघटनांच्या रॉकेट हल्ल्यांच्या धोक्यामुळे पंतप्रधान नेत्यान्याहू यांना हा युएईचा दौरा रद्द करावा लागला होता, अशीही माहिती समोर आली होती.

leave a reply