महाराष्ट्रात चोवीस तासात कोरोनाने १३२ जण दगावले

- २८,६९९ नव्या रुग्णांची नोंद

चोवीस तासातनवी दिल्ली – महाराष्ट्रात चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे १३२ जणांचा बळी गेला आहे. तसेच २८ हजार ६९९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात चोवीस तासात नोंदविल्या गेलेल्या कोरोनाच्या शंभरपेक्षा जास्त बळींमुळे आता चिंता अधिकच वाढल्या आहेत. सुमारे तीन महिन्याने राज्यात एका दिवसात कोरोनामुळे शंभरपेक्षा अधिक बळी गेले आहेत.

मंगळवारी मुंबईत ३५१२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तीन हजाराहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. ठाणे मंडळात ६,८७० नव्या रुग्णांची नोंद झाली असून २६ जणांचा बळी गेला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ८१४ आणि कल्याण-डोंबिवलीत ७२० नवे रुग्ण सापडले आहेत. नाशिक मंडळात चोवीस तासात ४३१९ नवे रुग्ण आढळले आहे, तर २१ जण दगावले आहेत. यातील सर्वाधिक ९४७ रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रात सापडले आहेत.

पुणे मंडळात कोरोनाचे ६३६६ नवे रुग्ण आढळले आहेत, तर २४ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिका क्षेत्रात ३९४५, पिंपरी-चिंचवडमध्ये १४८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूर मंडळात ३७४५ नवे रुग्ण साडपले आहेत. यातील २२७९ जण हे नागपूर महापालिका क्षेत्रात आढळले आहेत. औरंगाबाद क्षेत्रात २६६०, लातूर मंडळात २४१७ आणि अकोला मंडळात १८४४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात सोमवारी २४ हजार नवे रुग्ण आढळले होते. मात्र पुन्हा एकदा चोवीस तासात आढळलेल्या नव्या रुग्णांची संख्या २८ हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबई, पुणे, नागपूर शहरांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. मुंबईत चोवीस तासात ३६३ इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसेच यावर्षी रंगपंचमी खेळू नका, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

leave a reply