सिरियातील इराणच्या ठिकाणावर इस्रायलचे हवाई हल्ले

दमास्कस – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियाची राजधानी दमास्कस जवळ क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन मुखपत्राने केला. सिरियन लष्कराने वेळीच हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून इस्रायलचे हल्ले उधळून लावल्याचेही या मुखपत्राने म्हटले आहे. मात्र, या हवाई हल्ल्यात सिरियातील इराणचे शस्त्रास्त्रांचे गोदाम नष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी दमास्कस जवळच्याच इराणच्या गोदामावर इस्रायलने हल्ला चढविल्याचा आरोप झाला होता.

सिरियाची अधिकृत वृत्तसंस्था असलेल्या ‘सना’ने याची माहिती दिली. मंगळवारी रात्री इस्रायलच्या लढाऊ विमानांनी राजधानी दमास्कसजवळ हवाई हल्ले चढविले. पण सिरियन लष्कराने वेळीच हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून इस्रायलची बहुतांश क्षेपणास्त्रे भेदली. त्यामुळे या हल्ल्यात जीवितहानी झालेली नाही. पण काही प्रमाणात वित्तहानी झाल्याचे सिरियन वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे.

पण सिरियन माध्यमे आणि मानवाधिकार संघटनांनी याबाबत वेगळी माहिती दिली. मंगळवारी सकाळी इराणमधून शस्त्रास्त्रांचा साठा घेऊन प्रवासी व मालवाहू विमाने सिरियात दाखल झाली होती. जगभरातील प्रवासी व लष्करी विमानांच्या वाहतुकीची माहिती ठेवणार्‍या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी केशम एअर, महान एअर आणि सिरियन एअर फोर्सच्या विमानांनी इराण ते सिरिया असा प्रवास केला होता. या विमानांमधून इराणने सिरिया व लेबेनॉनसाठी शस्त्रास्त्रांची तस्करी केल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. या विमानातील शस्त्रसाठा दमास्कसपासून काही अंतरावर असलेल्या गोदामात साठविलेला होता. सदर गोदाम इराणच्या नियंत्रणाखाली होती. यापैकी दोन गोदामांवर इस्रायलने हवाई हल्ले चढविले. यामध्ये इराणचा शस्त्रसाठा नष्ट झाल्याचा दावा सिरियन वृत्तसंस्था व मानवाधिकार संघटनांनी केला. सदर गोदामांतील स्फोटाचे आवाज आजुबाजूच्या शहरांपर्यंत ऐकू गेल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

सिरियन वृत्तसंस्था तसेच मानवाधिकार संघटनांनी केलेल्या या दाव्यांबाबत इस्रायली लष्कराने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी रोजी देखील दमास्कसजवळच्या इराणच्या गोदामावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात इराणचा शस्त्रसाठा नष्ट झाल्याचे बोलले जात होते. सिरियन लष्कराने या हल्ल्यासाठी देखील इस्रायलला जबाबदार धरले होते.

महिन्याभरापूर्वी सिरियाच्या इतर भागात झालेल्या हवाई हल्ल्यांसाठी देखील सिरियन लष्कराने इस्रायलवर आरोप केला होता. या वर्षात इस्रायलने सिरियात चढविलेला हा आठवा हल्ला मानला जातो.

2011 साली अस्साद राजवटीच्या समर्थनार्थ इराण व हिजबुल्लाहने सिरियात पाऊल ठेवल्यापासून इस्रायलने या देशात हवाई हल्ले सुरू केले होते. इस्रायलने देखील आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी धोका ठरणार्‍या व सिरियात तळ ठोकणार्‍या इराणचे जवान, हिजबुल्लाह व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांवर कारवाई सुरू असल्याचे मान्य केले. तसेच पुढच्या काळातही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे इस्रायलच्या नेत्यांनी बजावले होते.

सिरियात सुरू असलेल्या गृहयुद्धाचा लाभ घेऊन इराणने या देशात आपले लष्करी तळ विकसित केले आहेत. त्याचा वापर इस्रायलच्या विरोधात करण्याची तयारी इराणने केली होती. मात्र इस्रायल ते कधीही खपवून घेणार नाही, असे सांगून इस्रायल आपल्या सिरियातील हल्ल्यांचे समर्थन करीत आहे.

इस्रायलच्या सिरियातील या हल्ल्यांवर सिरियाकडून टीका होत आहे. सिरियात लष्करी तैनाती असलेल्या रशियाकडूनही इस्रायलच्या या हल्ल्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. मात्र हे हल्ले टाळायचे असतील, तर इराणचा सिरियातील लष्करी हस्तक्षेप थांबविण्याची इस्रायलची मागणी सिरिया व रशियाला पूर्ण करता आलेली नाही. रशियाने यासंदर्भात इराणला वारंवार सूचना देऊनही इराण त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे सिरियाच्या मुद्यावर रशिया आणि इराणमध्ये मतभेद झाल्याचे समोर आले होते.

leave a reply