अरुणाचल प्रदेशमधील चीनलगतच्या सीमेजवळ युरेनियमचा शोध

युरेनियमचा शोधहैद्राबाद – अरुणाचल प्रदेशमधील चीनच्या सीमेपासून अवघ्या तीन किलोमीटर इतक्या अंतरावरील ठिकाणावर युरेनियमचा शोध घेतला जात आहे. या ठिकाणी युरेनियमचा साठा असू शकतो, असे ‘ऑटोमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्सप्लोरेशन अँड रिसर्च’चे (एएमडी) डायरेक्टर डी. के. सिन्हा यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारकडून या संशोधनाला प्रोत्साहन दिले जात आहे, हे देखील सिन्हा यांनी आवर्जुन सांगितले. अरुणाचल प्रदेश हा आपलाच भूूभाग असल्याचे दावे ठोकणार्‍या चीनकडून यावर प्रतिक्रिया येऊ शकते. त्यामुळे सिन्हा यांनी दिलेली ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरते.

भारताची ऊर्जेची गरज वाढत चालली असून पुढच्या काळात भारताला अणुऊर्जेची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासेल. यासाठी भारत ऑस्ट्रेलियासारख्या देशाकडून अणुइंधन असलेल्या युरेनियमची मोठ्या प्रमाणात आयात करण्याची तयारी करीत आहे. तसेच युरेनियमचे साठे असलेल्या इतर देशांकडूनही भारत हे अणुइंधन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत अरुणाचल प्रदेशमध्ये चीनलगतच्या सीमाभागाजवळ युरेनियमचा साठा सापडण्याची दाट शक्यता ही भारताचा उत्साह वाढविणारी बाब ठरते. डी. के. सिन्हा यांनी हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका परिसंवादाच्या दरम्यान ही माहिती उघड केली.

युरेनियमचा शोधअरुणाचल प्रदेशच्या पश्‍चिम सियांग जिल्ह्यात आलो येथे युरेनियम सापडण्याची शक्यता असून यावर काम सुरू झाले आहे. इथे युरेनियमचा साठा असण्याची शक्यता समोर आल्यानंतर त्यावर अधिक संशोधन सुरू झाले आहे. यासाठी केंद्र सरकारने विशेष उत्सुकता दाखविलेली आहे. त्यामुळे हे काम अधिक वेगाने पुढे जात असल्याचा दावा डी. के. सिन्हा यांनी केला. या दुर्गम भागात सदर संशोधनासाठी आवश्यक असलेले सहाय्य सरकारकडून उपलब्ध करून दिले जात आहे, असे सांगून संशोधक त्यावर समाधान व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, युरेनियमचा शोध घेतला जात असलेले हे ठिकाण चीनच्या सीमेपासून अवघ्या तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. अरुणाचल प्रदेश म्हणजे दक्षिण तिबेट असून तो आपलाच भूभाग असल्याचा दावा चीन करीत आहे. भारताने चीनचे हे दावे धुडकावले होते. अशारितीने अवैध दावे ठोकून चीन हा वादग्रस्त भूभाग बनवू शकत नाही, असे भारताने वारंवार बजावले होते. अरुणाल प्रदेश व ईशान्येकडील इतर राज्यांमधील भारतीय नेत्यांच्या तसेच विदेशी नेत्यांच्या भेटीवर आक्षेप घेऊन चीन या क्षेत्रावरील आपला अधिकार असल्याचा देखावा उभा करण्याच्या तयारीत होता.

युरेनियमचा शोधमात्र गेल्या काही वर्षांपासून अरुणाचल प्रदेशसह ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये पायाभूत सुविधांचे विकासप्रकल्प सुरू करून भारताने चीनच्या दाव्यातील हवाच काढून घेतली आहे. इतकेच नाही तर या क्षेत्रातील लष्कर व वायुसेनेची सज्जता वाढवून भारताने चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. लडाखच्या एलएसीवरील वादानंतर भारताने अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर देखील सतर्कता वाढविली असून इथेही भारतीय लष्कर तसेच वायुसेना पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही लष्करप्रमुख तसेच वायुसेनाप्रमुखांनी दिली होती.

काही महिन्यांपूर्वी चीन अरुणाचल प्रदेशच्या एलएसीजवळ गाव उभारण्याची तयारी करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र चीनच्या या कारवायांवर आपली करडी नजर रोखलेली आहे, असा संदेश भारताने दिला होता.

leave a reply