हिजबुल्लाहविरोधी युद्धासाठी इस्रायलच्या लष्कराची तयारी

-स्पेशल फोर्सेस सायप्रससाठी रवाना

जेरूसलेम – येत्या काळात लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या विरोधात युद्ध भडकलेच तर दरदिवशी 1,500 रॉकेट्स इस्रायली शहरांवर कोसळतील. यामुळे इस्रायलमधील बळींची संख्या शेकडोंवर जाऊ शकते, असा इशारा इस्रायली लष्करानेच दिला होता. हा धोका लक्षात घेऊन इस्रायली संरक्षणदलाने मोठ्या सरावाची तयारी केली आहे. याअंतर्गत इस्रायली संरक्षणदलांचे स्पेशल फोर्सेस सायप्रससाठी रवाना झाले आहेत. थेट लेबेनॉनमध्ये घुसून हिजबुल्लाहवर हल्ले चढविण्याचा सराव इस्रायली लष्कर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

bennett-nasrallahगेल्या काही दिवसांपासून इस्रायलचे संरक्षणदल ‘चॅरिअट्स ऑफ फायर’ हा सराव करीत आहेत. महिनाभर चालणाऱ्या या सरावाच्या माध्यमातून इस्रायली हवाईदल इराणच्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले चढविण्याचा सराव करीत आहे. त्याचबरोबर इस्रायलसाठी धोका ठरणाऱ्या इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्याचा सराव केला जाईल. या सरावात इस्रायली लष्कराने लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर कारवाई केली.

या सिम्युलेशन सरावानंतर इस्रायली लष्कराने केलेल्या मुल्यांकनात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. इस्रायलच्या सीमेपासून दूरवर असलेल्या शहरांनाही लक्ष्य करण्यासाठी हिजबुल्लाहकडे किमान दीड लाख रॉकेट् व क्षेपणास्त्रे असल्याचा दावा इस्रायली लष्कर करीत आहे. सध्याच्या परिस्थितीत, हिजबुल्लाह इस्रायलवर प्रति दिन दीड हजार रॉकेट्सचे हल्ले चढवू शकतो. बरेच दिवस चालणाऱ्या या संघर्षात इस्रायलची 80 शहरे, ठिकाणे या रॉकेटसच्या टप्प्यात येऊ शकतात. यामुळे 300 इस्रायलींचा बळी जाऊ शकतो, असा निष्कर्ष इस्रायली लष्कराने नोंदविला होता.

isreal-troops-cyprusया पार्श्वभूमीवर, इस्रायली संरक्षणदलातील स्पेशल फोर्सेसचे पथक हिजबुल्लाहविरोधी युद्धाची तयारी करण्यासाठी सायप्रसला रवाना झाले आहे. लेबेनॉनमध्ये घुसून हिजबुल्लाहची मुख्य ठिकाणे व नेत्यांना लक्ष्य करण्याचा सराव सायप्रसमधील ‘चॅरिअट्स ऑफ फायर’दरम्यान केला जाईल. यामध्ये इस्रायली हेलिकॉप्टर्स देखील सहभागी होणार आहेत. इस्रायली संरक्षणदलांसाठी अशा प्रकारचा हा पहिलाच सराव ठरणार आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि हिजबुल्लाह एकमेकांना धमकावत आहेत. आठवड्यापूर्वी इस्रायलने सिरियात चढविलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या तिघांना मारल्याचा दावा केला जातो. यानंतर संतापलेला हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने इस्रायलला गंभीर परिणामांची धमकी दिली होती. इराण आणि हिजबुल्लाह इस्रायलविरोधात नवे युद्ध छेडण्याची तयारी करीत असल्याचा दावा आखाती माध्यमांनी केला होता.

हिजबुल्लाह व पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटनांकडून दिल्या जाणाऱ्या रॉकेट हल्ल्यांच्या धमक्यांवर इस्रायलने जळजळीत इशारे दिले होते. जर हिजबुल्लाहने असे हल्ले चढविलेच, तर इस्रायल कुणी विचारही केला नसेल, इतके जबरदस्त प्रत्युत्तर देईल, असे इस्रायली संरक्षणदलांनी बजावले होते. सध्या इस्रायलच्या उत्तरेकडील भागात व सायप्रसमध्ये सुरू असलेला इस्रायली संरक्षणदलांचा सराव, या प्रत्युत्तराची तयारी करणारा असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply