चीनबरोबरील सहकार्यातून पॅसिफिक बेटदेशांची माघार

सुवा – ‘कॉमन डेव्हलपमेंट व्हिजन’ नावाचा प्रस्ताव घेऊन चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी पॅसिफिक क्षेत्रातील सात बेटदेशांच्या दौऱ्यावर आहेत. या बेटदेशांनी चीनसह व्यापारी आणि सुरक्षाविषयक करार करावे, यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री प्रयत्न करीत आहेत. पण याबाबत पॅसिफिक बेटदेशांमध्ये एकमत नसल्याचे सांगून फिजीच्या पंतप्रधानांनी सदर सहकार्याला स्पष्ट नकार दिला. यामुळे हादरलेल्या चीनने चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगून पॅसिफिक बेटदेशांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

china-pacific-islandगेल्या आठवड्यात जपानमध्ये क्वाडची बैठक पार पडली. यानिमित्ताने अमेरिकेने आशिया-प्रशांत क्षेत्रातील 13 देशांसह ‘इंडो-पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क-आयपीईएफ’ या विशेष आर्थिक गटाची घोषणा केली. यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने पॅसिफिक क्षेत्रातील बेटदेशांबरोबर सुरक्षा सहकार्य प्रस्थापित करून अमेरिका व ऑस्ट्रेलियाला घेरण्याची तयारी केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. चीनने आपल्यावरील हे आरोप फेटाळले होते. पण पॅसिफिक क्षेत्रातील दहा बेटदेशांबरोबर ‘कॉमन डेव्हलपमेंट व्हिजन’ नावाचा कार्यक्रम सुरू करणार असल्याची घोषणा चीनने केली. याअंतर्गत सदर पॅसिफिक बेटदेशांबरोबर व्यापार आणि सुरक्षा सहकार्य करण्याचे संकेत चीनने दिले होते. तसेच या प्रस्तावाला सर्व पॅसिफिक बेटदेशांनी मान्यता द्यावी यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी गुरुवारपासून पॅसिफिक बेटदेशांच्या दौऱ्यावर रवाना झाले होते.

यासंबंधी फिजीमध्ये आयोजित बैठकीत चीनला निराशा हाती लागली आहे. कारण सोमवारी फिजीचे पंतप्रधान फ्रँक बैनिमरामा यांनी स्पष्ट शब्दात चीनच्या या प्रस्तावावर पॅसिफिक बेटदेशांचे एकमत नसल्याचे स्पष्ट केले. या क्षेत्रातील कुठल्याही सहकार्याबाबत पॅसिफिक बेटदेशांचे एकमत असेल, तरच त्याचा स्वीकार केला जातो. पण चीनच्या या प्रस्तावाबाबत पॅसिफिक बेटदेशांना तशी हमी मिळत नसल्याचे पंतप्रधान बैनिमरामा यांनी ठणकावले.

फिजीच्या पंतप्रधानांचा हा नकार चीनसाठी हादरा मानला जातो. परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी पॅसिफिक बेटदेशांना विनाकारण चिंता न करण्याचा सल्ला दिला. तसेच चीनबरोबरच्या सहकार्यामुळे साऱ्या जगात सौहार्द प्रस्थापित होईल, असा दावा परराष्ट्रमंत्री यी यांनी केला. पण सॉलोमन आयलँड्सबरोबर चीनने केलेल्या सहकार्याचे उदाहरण समोर असलेले पॅसिफिक बेटदेश चीनच्या या भुलथापांनी हुरळणार नसल्याचा दावा ऑस्ट्रेलियन माध्यमे करीतआहेत.

leave a reply