सिरियातील इराणच्या हवाई तळावर इस्रायलचे हल्ले

-सिरियन माध्यमांचा दावा

दमास्कस – सिरियाच्या होम्स शहरातील ‘टी-४’ हवाई तळावर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हल्ले चढविल्याचा दावा सिरियन माध्यमांनी केला. गेल्या तीन दिवसात इस्रायलने सिरियात केलेला हा दुसरा हल्ला ठरतो. याआधी सोमवारी राजधानी दमास्कसजवळील लष्करी तळावर इस्रायलने चढविलेल्या हल्ल्यात ११ जणांचा बळी गेला होता. यामध्ये इराणच्या कुद्स फोर्सेसचे नवे कमांडर इस्माईल गनी ठार झाल्याचे बोलले जात होते. या बातमीने काही काळासाठी खळबळ उडाली होती. पण गनी या हल्ल्यातून बचावल्याचे इराणच्या सूत्रांनी म्हटले होते.

इस्रायलचे हल्ले

सिरियातील इराणचे नियंत्रण असलेल्या ‘टी-४’ या हवाई तळावर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी क्षेपणास्त्रांचे जोरदार हल्ले चढविले. बुधवारी रात्री इस्रायली विमानांनी चढविलेले हे हल्ले सिरियन हवाई सुरक्षा यंत्रणांनी यशस्वीरित्या भेदले. इराक सीमेजवळ असलेल्या ‘अल-तन्फ’ या अमेरिकेच्या ताब्यातील भागातून इस्रायली विमानांनी प्रवेश करुन हे हल्ले चढविल्याचा दावा सिरियन माध्यमांनी केला. ‘टी-४’ किंवा ‘तियास’ या नावाने ओळखले जाणारे सदर विमानतळ इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डस व अल कुद्स फोर्सेसच्या ताब्यात असल्याचा आरोप इस्रायलने याआधी केला होता. हिजबुल्लाहला शस्त्रास्त्रे पुरविण्यासाठी तसेच क्षेपणास्त्रांची गोदामे आणि ड्रोन्सच्या तैनातीसाठी या तळाचा वापर केला जातो. त्यामुळे याआधीही सदर हवाई तळावर इस्रायलने हल्ले चढविले होते. पण बुधवारच्या रात्री झालेल्या या हल्ल्यांबाबत सिरियन माध्यमांनी केलेल्या दाव्यावर इस्रायलने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

इस्रायलचे हल्लेया हल्ल्याच्या दोन दिवस आधी, सोमवारी रात्री सिरियन राजधानी दमास्कसजवळ झालेल्या हवाई हल्ल्यात ११ जणांचा बळी गेला होता. यामध्ये सिरियन लष्कराचे दोन तर इराण संलग्न गटाचे पाच जण ठार झाले होते. त्याचबरोबर इराणच्या लष्करातील प्रभावी पथक म्हणून ओळखल्या जाणार्‍या कुद्स फोर्सेसचे प्रमुख जनरल गनी देखील या हल्ल्यात ठार झाल्याचे बोलले जात होते. जानेवारी महिन्यात अमेरिकेने केलेल्या हवाई कारवाईत कुद्स फोर्सेसचे तत्कालिन प्रमुख जनरल कासेम सुलेमानी ठार झाल्यानंतर गनी यांची नियुक्ती झाली होती. अवघ्या काही महिन्यात गनी देखील ठार झाल्यामुळे इराणला जबद हादरा बसल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली होती. पण इराणच्या लष्करी सूत्रांनी ही माहिती फेटाळली, तसेच जनरल गनी या हल्ल्यातून बचावल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर सिरियातील आपल्या हितसंबंधांवर होणार्‍या हल्ल्यांसाठी इस्रायलला मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी इराणच्या वर्तमानपत्राने दिली होती.

दरम्यान, इस्रायलने सिरियातील इराण, हिजबुल्लाह व इराणसंलग्न ठिकाणांवर हजाराहून अधिक हल्ले चढविल्याची घोषणा इस्रायलचे माजी संरक्षणदलप्रमुख गादी अश्केनॉत यांनी केली होती. त्याचबरोबर सिरियातील इराणशी संबंधित ठिकाणांवर हल्ले चढविणार असल्याचा इशारा इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला होता.

leave a reply