इस्रायली दैनिकांचे संकेतस्थळ हॅक इस्रायलच्या अणुप्रकल्पावर हल्ले चढविण्याची धमकी

जेरूसलेम – इस्रायलच्या आघाडीच्या दैनिकांवर सायबर हल्ले झाले. इराणच्या कुद्स फोर्सेसचे वरिष्ठ अधिकारी कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी, इस्रायलच्या दिमोना अणुप्रकल्पावर हल्ले चढविण्याची धमकी या हॅकर्सनी दिली. काही दिवसांपूर्वी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत दिमोना अणुप्रकल्पावर इराणची 16 क्षेपणास्त्रे कोसळल्याचे दाखविले होते. त्यामुळे इस्रायली दैनिकांवरील सायबर हल्ला आणि त्यातून दिलेल्या धमकीमागे इराण असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातो.

इस्रायली दैनिकांचे संकेतस्थळ हॅक इस्रायलच्या अणुप्रकल्पावर हल्ले चढविण्याची धमकीसोमवारी सकाळी इस्रायली दैनिकांचे संकेतस्थळ तसेच सोशल मीडिया अकाऊंट्सवर सायबर हल्ले झाले. यामध्ये हॅकर्सनी इस्रायली दैनिकांचे संकेतस्थळ काही तासांसाठी हॅक करून त्यावर चिथावणी देणारी प्रतिमा प्रसिद्ध केला होता. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झालेले इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी मेजर जनरल कासेम सुलेमानी यांच्या अंगठीतून क्षेपणास्त्र प्रक्षेपित झाल्याची प्रतिमा या दाखविण्यात आलेली आहे. सदर क्षेपणास्त्र इस्रायलच्या दिमोना अणुप्रकल्पावर कोसळल्याचे यात दाखविले होते. याबरोबरच ‘तुम्ही विचारही केला नसेल इतके आम्ही तुमच्या जवळ पोहोचलो आहोत`, असा संदेश इंग्रजी आणि हिब्रू भाषेत लिहिला आहे.

या सायबर हल्ल्यामागील संशयितांचा शोध सुरू आहे. कुठल्याही गटाने याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण सायबर हल्लेखोरांनी संकेतस्थळावर पोस्ट केलेला फोटो इराणकडे बोट दाखवित असल्याचे दावे इस्रायली माध्यमे करीत आहेत. गेल्या आठवड्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी पाच दिवसांचा सराव आयोजित केला होता. यामध्ये लघू व दिर्घ पल्ल्यांची क्षेपणास्त्रे, ड्रोन्सचे हल्ले चढविण्याचा सराव करण्यात आला होता. या सरावाच्या अखेरच्या दिवशी तर इराणच्या लष्कराने सलग 16 क्षेपणास्त्रे डागून आपली क्षमता दाखवून दिली होती.

इस्रायली दैनिकांचे संकेतस्थळ हॅक इस्रायलच्या अणुप्रकल्पावर हल्ले चढविण्याची धमकीहा सराव संपल्यानंतर रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सशी संलग्न असलेल्या वृत्तवाहिनीने या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यात सदर क्षेपणास्त्रे व त्यामागोमाग ड्रोन्स एका अणुप्रकल्पावर कोसळल्याचे दाखविले होते. व्हिडिओमध्ये देशाचा उल्लेख केला नव्हता. पण इराणने या व्हिडिओद्वारे इस्रायलच्या दिमोना अणुप्रकल्पावर हल्ल्ल्याचा इशारा दिल्याचा दावा विश्‍लेषकांनी केला होता. या व्हिडिओतील फोटो सोमवारच्या सायबर हल्ल्यांमध्ये दाखविल्यामुळे यामागे इराण असल्याचा दाट संशय व्यक्त केला जातो.

गेल्या काही दिवसांपासून इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सचे अधिकारी इस्रायलवर हल्ल्याचे इशारे देत आहेत. इराणवर हल्ला चढवण्याची चूक केल्यास इस्रायलचे हात छाटून टाकण्याची धमकी इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिली होती. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायली दैनिकांवर सायबर हल्ला चढवून दिलेल्या इशाऱ्यांचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

leave a reply