ब्रिटनच्या ‘डिफेन्स ॲकेडमी`वर मोठा सायबरहल्ला झाल्याचा दावा

‘डिफेन्स ॲकेडमी`लंडन – ब्रिटनच्या संरक्षण विभागाचा प्रमुख हिस्सा असणाऱ्या ‘डिफेन्स ॲकेडमी`वर मोठा सायबरहल्ला झाल्याचे उघड झाले आहे. ब्रिटनचे माजी संरक्षणअधिकारी एअरमार्शल एडवर्ड स्टिंगर यांनी याची कबुली दिली. वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सायबरहल्ल्याची कबुली देण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते. सदर सायबरहल्ला चीन, रशिया, उत्तर कोरिया अथवा इराणने घडविला असावा, असा दावा स्टिंगर यांनी केला आहे.

ब्रिटनच्या संरक्षणदलातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘डिफेन्स ॲकेडमी`वर सायबरहल्ला झाल्याचे गेल्या वर्षी उघड झाले होते. ॲकेडमीच्या कॉम्प्युटर नेटवर्कची जबाबदारी असणाऱ्या ‘सर्को` या कंपनीला पहिल्यांदा सायबरहल्ल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ॲकेडमीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसेच संरक्षण विभागाला तातडीने त्याची माहिती देण्यात आली. सायबरहल्ला पूर्णपणे यशस्वी झाला नाही, मात्र हल्ल्यामुळे ॲकेडमीच्या नेटवर्कचे अतिशय गंभीर व मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे माजी अधिकारी एअरमार्शल एडवर्ड स्टिंगर यांनी स्पष्ट केले.

‘डिफेन्स ॲकेडमी`सायबरहल्ला करणाऱ्या हॅकर्सनी ब्रिटनच्या संरक्षणविभागाच्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी ‘बॅकडोअर चॅनल` म्हणून ॲकेडमीच्या नेटवर्कचा वापर केल्याचा संशय आहे, असेही स्टिंगर यांनी ब्रिटीश वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. हल्ल्यामुळे ॲकेडमीच्या नेटवर्कचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वेबसाईट नव्याने तयार करण्यात येत असल्याचेही स्टिंगर यांनी यावेळी सांगितले. ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा भाग असलेल्या ‘द नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटर`लाही हल्ल्यासंदर्भात कल्पना देण्यात आली होती, असे माजी अधिकाऱ्यांनी नमूद केले.

‘डिफेन्स ॲकेडमी`वर झालेला सायबरहल्ला ‘ग्रे झोन अटॅक` होता, अशी माहितीही स्टिंगर यांनी दिली. ‘ग्रे झोन अटॅक` हा युद्धापेक्षा एक स्तर कमी असणारा हल्ला म्हणून ओळखण्यात येतो. यापूर्वी ब्रिटनवर झालेल्या सायबरहल्ल्यांमागे रशिया व चीनचा हात असल्याची माहिती समोर आली होती. वाढत्या सायबरहल्ल्यांना तोंड देण्यासाठी ब्रिटनने ‘सायबर फोर्स` उभारली असून सायबरवेपन्स विकसित करण्याचेही संकेत दिले आहेत.

leave a reply