इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट युएईच्या ऐतिहासिक दौर्‍यावर

नफ्ताली बेनेटजेरूसलेम – इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट रविवारी युएईच्या ऐतिहासिक दौर्‍यासाठी रवाना झाले. इस्रायलच्या पंतप्रधानांनी युएईला दिलेली ही पहिलीच भेट ठरते. ‘इस्रायल आणि युएई यांच्यात सर्व क्षेत्रात असलेले सहकार्य अधिक भक्कम करणे, हे माझ्या या दौर्‍याचे ध्येय आहे’, असे पंतप्रधान बेनेट म्हणाले. या दौर्‍यात पंतप्रधान बेनेट युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायद यांची भेट घेणार आहेत. व्हिएन्ना येथे इराणच्या अणुकराराबाबत चर्चा सुरू असताना इस्रायलच्या पंतप्रधानांचा युएई हा दौरा लक्षवेधी ठरतो.

गेल्या वर्षी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्रायल आणि युएई यांच्यात अब्राहम करार पार पडला. यानंतर उभय देशांमध्ये विविध क्षेत्रातील सहकार्य करार पार पडले. युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायद यांनी इस्रायलचे तत्कालिन पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांना युएईच्या दौर्‍यासाठी आमंत्रित केले होते. पण काही कारणास्तव हा दौरा पुढे ढकलावा लागला होता. त्यानंतर रविवारी सकाळी इस्रायलच्या सरकारने पंतप्रधान बेनेट यांच्या युएई दौर्‍याची घोषणा केली.

रविवारी कॅबिनेटची बैठक पूर्ण करून पंतप्रधान बेनेट दुपारी युएईसाठी रवाना झाले. पंतप्रधान बेनेट यांचा हा एक दिवसाचा दौरा असल्याचे इस्रायली पंतप्रधानांच्या कार्यालयाने स्पष्ट केले. सोमवारी सकाळी पंतप्रधान बेनेट युएईचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झाएद यांची भेट घेतील. यात उभय देशांमधील आर्थिक सहकार्य तसेच क्षेत्रीय मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे इस्रायलने जाहीर केले. तर उभय देशांच्या सुरक्षेच्या मुद्यावरही महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

पण इस्रायली पंतप्रधानांचा हा तातडीचा युएई दौरा याहून अधिक महत्त्वाचा असल्याचे इस्रायली विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. इराणच्या अणुकार्यक्रमावर इस्रायलसह सौदी, युएई व इतर अरब देश चिंता व्यक्त करीत आहेत. व्हिएन्ना येथील बैठकीला दोन आठवडे उलटले असून इराण चालढकल करून त्या अवधीचा वापर अण्वस्त्रसज्ज होण्यासाठी करीत असल्याचा इस्रायलचा आरोप आहे. या चर्चेत सहभागी झालेले युरोपिय देश देखील यावरुन इराणला बजावत आहेत. पण अमेरिकेचे बायडेन प्रशासन या इशार्‍यांकडे दुर्लक्ष करीत असून इराणशी वाटाघाटीवर करण्यावर ठाम आहे. यामुळे सौदी अरेबिया, युएई व इतर अरब मित्रदेश इराणविरोधात एकत्र आल्याचे दिसू लागले आहे.

काही दिवसांपूर्वी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी देखील अरब मित्रदेशांचा दौरा करून इराणच्या मुद्यावर चर्चा केली होती. अशा परिस्थितीत, इस्रायलच्या पंतप्रधानांच्या या युएई दौर्‍याला फार मोठे राजकीय व सामरिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

leave a reply