‘तेहरिक-ए-तालिबान’शी तालिबानचा संबंध नाही

- तालिबानच्या प्रवक्त्याने हात झटकले

तालिबानचा संबंधकाबुल – ‘तेहरिक-ए-तालिबान हा अफगाणिस्तानातील तालिबानचा गट नाही. आमची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत’, असे तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्ला मुजाहिद म्हणाला. याद्वारे पाकिस्तानच्या सरकारबरोबरील संघर्षबंदी मोडीत काढणार्‍या ‘तेहरिक’च्या कारवायांसाठी आम्हाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असा संदेश तालिबानने पाकिस्तानला दिला आहे. त्याचवेळी तालिबानला हवी अशी राजवट पाकिस्तानात अस्तित्वात नसल्याचे खोचक विधान मुजाहिदने केले आहे. वेगळ्या शब्दात तेहरिक मागणी करीत असलेल्या राजकीय व्यवस्थेला आपला पाठिंबा असल्याचे संकेत तालिबानचा प्रवक्ता देत असल्याचे दिसते.

दोन दिवसांपूर्वी तेहरिक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेचा प्रमुख नूर वली मेहसूद याने पाकिस्तानबरोबरच्या संघर्षबंदीतून माघार घेण्याचे जाहीर केले. त्याचबरोबर आपल्या साथीदारांना पाकिस्तानात हल्ले चढविण्याचे आदेश तेहरिकच्या प्रमुखाने दिले होते. तर पाकिस्तानच्या राजवटीविरोधात संघर्ष करणारी तेहरिक ही अफगाणिस्तानच्या सत्तेवर असलेल्या तालिबानच्या अनेक गटांपैकी एक असल्याचे मेहसूदने जाहीर केले होते.

तालिबानचा संबंधतेहरिकच्या प्रमुखाने केलेल्या या घोषणेला काही तास उलटत नाही तोच, तालिबान या दहशतवादी संघटनेचा प्रवक्ता झबिउल्ला मुजाहिद याने सौदी अरेबियाच्या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. तेहरिक हा तालिबानचा गट नसून दोन्ही गटांची उद्दिष्टे भिन्न असल्याचे मुजाहिदने स्पष्ट केले. यानंतर तालिबानच्या प्रवक्त्याने तेहरिकला सल्ला दिला असून पाकिस्तानच्या सरकारलाही इशारा दिला आहे. त्याचबरोबर तेहरिकच्या मागणीप्रमाणे पाकिस्तानात त्यांना हवी असलेली राजवट व कायदे अस्तित्त्वात नाही, हे मुजाहिदने या मुलाखतीत लक्षात आणून दिले.

पाकिस्तानच्या सरकारला आपल्या देशाची आणि या क्षेत्राच्या हिताची पर्वा असेल तर त्यांनी तेहरिकच्या मागण्यांवर विचार करावा, असे मुजाहिदने म्हटले आहे. ‘तेहरिक आणि पाकिस्तानने आपले वाद चर्चेने सोडवावे. त्यामध्ये तालिबान दखल देणार नाही’, असे मुजाहिद पुढे म्हणाला. यामुळे ऑक्टोबर महिन्यात तालिबानच्या राजवटीचा परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी याने तेहरिक आणि पाकिस्तानमध्ये घडविलेली संघर्षबंदी यापुढे शक्य नसल्याचे स्पष्ट संकेत मुजाहिदने दिले आहेत.

तालिबानचा संबंधतालिबानच्या प्रवक्त्याची ही मुलाखत तेहरिकच्या धमकीपेक्षाही पाकिस्तानच्या चिंता वाढविणारी असल्याचे पाकिस्तानातील पत्रकारांचे म्हणणे आहे. तालिबानने तेहरिक आपल्यातील गट नसल्याचे जाहीर केले असले तरी तेहरिकच्या मागण्यांचे अप्रत्यक्षरित्या समर्थन केले आहे. ज्या तालिबानला गेली दोन दशके पाकिस्तानने आश्रय दिला, अफगाणिस्तानच्या सत्तेवर येण्यासाठी सहाय्य केले, तेच आज पाकिस्तानच्या व्यवस्थेतील दोष दाखवून तेहरिकच्या मागण्या मान्य करण्याची सूचना करीत आहेत, अशी खंत पाकिस्तानचे पत्रकार व्यक्त करीत आहेत.

तेहरिकचा प्रमुख मेहसूदच्या घोषणेनंतर तेहरिकच्या दहशतवाद्यांनी गेल्या चोवीस तासात पाकिस्तानात दोन हल्ले चढविले आहेत. पाकिस्तानच्या टँक जिल्ह्यात पल्स पोलिओच्या मोहिमेला सुरक्षा पुरविणार्‍या जवानांवर तेहरिकच्या दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. त्याचबरोबर अन्य एका ठिकाणी तेहरिकने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी पोलीस दलाचे सहा जवान मारले गेल्याचा दावा केला जातो. त्यामुळे तेहरिकचे हल्ले सुरू झालेले असताना तालिबानच्या प्रवक्त्याने तेहरिकशी संबंध नसल्याचे सांगून आपले हा झटकले आहेत. हा पाकिस्तानला बसलेला फार मोठा धक्का ठरतो.

leave a reply