इस्रायली पाणबुड्यांची इराणवर नजर

- इस्रायलच्या लष्करी अधिकार्‍याची माहिती

जेरूसलेम – इराक किंवा येमेनच्या भूभागाचा वापर करून इराण इस्रायलवर हल्ला चढवू शकतो. यासाठी इराण या दोन्ही देशांमध्ये ड्रोन्स आणि स्मार्ट क्षेपणास्त्रे तैनात करून त्यांचा वापर करील. पण इस्रायलच्या पाणबुड्यांची इराणच्या या सार्‍या हालचालींवर बारीक नजर आहे, असा इशारा इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल हिदाई झिल्बरमन यांनी दिला. सौदी अरेबियाच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ब्रिगेडिअर जनरल झिल्बरमन यांनी हे दावे केले आहेत. इस्रायली अधिकार्‍याच्या या मुलाखतीनंतर इराणच्या नौदलाने आपल्या सागरी सीमेच्या सुरक्षेसाठी इराण पूर्ण सज्ज असल्याचे जाहीर केले आहे.

गेल्या आठवड्यात इस्रायलच्या वृत्तवाहिनीने बातमी प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली होती. इस्रायली नौदलाच्या पाणबुडीने ‘सुएझ कालवा’ ओलांडून ‘रेड सी’च्या दिशेने प्रवास केल्याचा दावा इस्रायली वृत्तवाहिनीने केला होता. इजिप्तच्या सरकारने इस्रायली पाणबुडीच्या या गस्तीसाठी सुएझ कालव्याचा वापर करण्याची परवानगी दिली होती. पुढे इस्रायली पाणबुडी पर्शियन आखाताच्या दिशेने निघाल्याचे इस्रायली वृत्तवाहिनीने अरब गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले होते. इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा करणार्‍या इराणला इशारा देण्यासाठी इस्रायलच्या नौदलाने ही कारवाई केल्याचे सूत्रांचे म्हणणे होते.

इस्रायलच्या लष्कराने या वृत्तावर काहीही बोलण्याचे टाळले. पण दोन दिवसांपूर्वी इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल झिल्बरमन यांनी सौदी अरेबियाच्या दैनिकाशी बोलताना इस्रायलच्या पाणबुड्यांची माहिती उघड केली. इस्रायलच्या पाणबुड्या सर्वत्र शांतपणे संचार करीत आहेत. आखाती क्षेत्रातील इराणच्या प्रत्येक हालचालींवर इस्रायली करडी नजर आहे, असे झिल्बरमन यांनी स्पष्ट केले.

मात्र आपला प्रभाव असलेल्या इराक आणि येमेन या आखाती देशांचा वापर करून इराण इस्रायलवर हल्ले चढवू शकतो, याची माहिती आपल्याकडे असल्याचे इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. इराक व येमेनमधून इस्रायलवर हल्ला चढवू शकतील, अशा ड्रोन्स व स्मार्ट क्षेपणास्त्रांचा इराण वापर करील, असा दावा झिल्बरमन यांनी केला. यासंबंधी अधिक माहिती झिल्बरमन यांनी दिली नाही. पण काही दिवसांपूर्वी येमेनमधील हौथी बंडखोरांनी इस्रायलच्या दक्षिणेकडील भूभागावर हल्ले चढविणारी क्षेपणास्त्रे आपल्याकडे असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ब्रिगेडियर जनरल झिल्बरमन यांनी केलेल्या दाव्यांचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

दरम्यान, सिरियातील इराणच्या ठिकाणांवर सुरू असलेले इस्रायलचे हल्ले थांबणार नाहीत, असे ब्रिगेडियर जनरल झिल्बरमन यांनी बजावले आहे. गेल्या वर्षभरात इस्रायलने सिरियातील इराणच्या ठिकाणांवर हल्ल्यांसाठी ५०० क्षेपणास्त्रांचा वापर केला. या कारवाईमुळे इराणवरील दबाव वाढला असून इस्रायल कुठल्याही परिस्थितीत, हा दबाव मागे घेण्याच्या तयारीत नाही, असे झिल्बरमन यांनी म्हटले आहे.

अमेरिका व इस्रायल इराणवर हल्ला चढविण्याच्या तयारीत आहेत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आपला कार्यकाळ संपण्याच्या आधी हा हल्ला घडवून आणतील, असा आरोप इराण करीत आहे. तर इराकमधील अमेरिकन नागरिकांवर हल्ला झाला, तर अमेरिका त्यासाठी इराणला जबाबदार धरील, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नुकतेच इराणला बजावले होते. यामुळे आखाती क्षेत्रात परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

leave a reply