इस्रायलच्या हल्ल्यामुळे सिरियाच्या दमास्कस विमानतळाची सेवा खंडीत

-रशियाने इस्रायलवर टीका केली

दमास्कस – इस्रायलने सिरियात चढविलेल्या हवाई हल्ल्यात राजधानी दमास्कसमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठे नुकसान केले. येथील मुख्य धावपट्टी आणि विमानतळावरील प्रवासी कक्ष पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. इराण आणि हिजबुल्लाह या प्रवासी कक्षाचा वापर करीत होते, असा दावा लंडनस्थित मानवाधिकार संघटनेने केला. तर रशियाने इस्रायलच्या या कारवाईवर सडकून टीका केली. इस्रायलने बेकायदेशीरपणे येथील नागरी सुविधांना लक्ष्य केल्याचा आरोप रशियाने केला. दरम्यान, रशिया आणि सिरियन हवाईदलात पार पडलेल्या युद्धसरावानंतर इस्रायलने हा हल्ला चढविला, याकडे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्ष वेधत आहेत.

syria-damascus-airportदोन दिवसांपूर्वी सिरियाची राजधानी दमास्कसच्या दक्षिणेकडे हवाई हल्ले झाले होते. सिरियाच्या सरकारी माध्यमांनी लष्करी सूत्रांच्या हवाल्याने या हल्ल्यांसाठी इस्रायलला जबाबदार धरले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात हे हल्ले चढविल्याची बातमी सिरियन माध्यमांनी दिली होती. तसेच लष्कराने वेळीच हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून इस्रायली विमानांना पिटाळून लावल्याचा दावा या माध्यमांनी केला. आठवड्याभरात इस्रायलने दमास्कममध्ये चढविलेला हा दुसरा हल्ला होता.

इस्रायलने या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पण पुढच्या काही तासांमध्ये दमास्कस विमानतळासंबंधी तपशील, सॅटेलाईट फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर या हल्ल्याचे महत्त्व वाढले. दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी आणि प्रमुख प्रवासी कक्ष या हल्ल्याचे लक्ष्य होते. धावपट्टीचे नुकसान झाल्यामुळे सिरियन यंत्रणांनी दमास्कस विमानतळावरील सर्व सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद केल्या आहेत. त्यामुळे सिरियातील प्रवासी हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचा दावा केला जातो.

विमानतळावरील प्रवासी कक्षाचे या हल्ल्यात मोठे नुकसान झाले. सुरुवातीला सिरियन यंत्रणांनी विशेष नुकसान झालेले नाही, असे सांगून प्रवासी कक्षाबाबत माहिती देण्याचे टाळले होते. पण सिरियातील लंडनस्थित मानवाधिकार संघटनेने या प्रवासी कक्षाचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर हे नुकसान जगासमोर आले. तसेच टेहळणी टॉवर आणि नेव्हिगेशनसाठी वापरली जाणारी यंत्रणा देखील निकामी झाल्याचे सिरियातील मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे.

या विमानतळावरल प्रवासी कक्षाचा वापर इराण व हिजबुल्लाहचे दहशतवादी करीत होते, असा दावा या संघटनेने केला. तसेच विमानतळाच्या आवारात इराणकडून वापरले जाणारे क्षेपणास्त्रांच्या कोठारांचे देखील या हवाई हल्ल्यात नुकसान झाल्याची माहिती लंडनस्थित मानवाधिकार संघटनेने दिली. इस्रायलमधील कंपनीने प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट फोटोग्राफ्समध्ये धावपट्टीचे नुकसान झाल्याची माहिती दिली.

इस्रायलने दमास्कस विमानतळावर चढविलेल्या या हवाई हल्ल्यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. सिरियातील नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले चढविण्याची इस्रायलची जुनी खोड असल्याची टीका रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली. इस्रायलच्या या कारवाया प्रक्षोभक आणि चिथावणखोर असल्याचे ताशेरे रशियन परराष्ट्र मंत्रालयाने ओढले. गेल्या महिन्याभरात रशियाने सिरियातील इस्रायलच्या कारवाईवर दुसऱ्यांदा टीका केली आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वीच रशिया आणि सिरियाच्या लढाऊ विमानांनी शत्रूची विमाने व ड्रोन्सना प्रत्युत्तर देण्याचा हवाईसराव केला होता. रशिया-सिरियाचा हा सराव इस्रायलसाठी इशारा असल्याचा दावा विश्लेषकांनी केला होता. त्यानंतर पुढच्या दोन दिवसात इस्रायलने सिरियात मोठा हल्ला चढविला. यामुळे इस्रायल आणि रशियाच्या संबंधात तणाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. याआधीही सिरियातील इस्रायलच्या हल्ल्यामुळे रशिया व इस्रायलमधला तणाव वाढला होता. पण त्या काळात इस्रायलच्या पंतप्रधानपदावर असलेल्या बेंजामिन नेत्यान्याहू यांना रशियाबरोबरील तणाव कमी करण्यात यश मिळाले होते.

leave a reply