इराणचे मेजर जनरल सुलेमानी यांना संपविण्यात इस्रायलचा हात

- इस्रायलच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍याचा दावा

जेरूसलेम – गेल्या वर्षी अमेरिकेने चढविलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल कासेम सुलेमानी ठार झाले होते. अमेरिकेच्या या कारवाईत इस्रायलही सहभागी असल्याचे आरोप इराणने केले होते. त्यावेळी इस्रायलने या आरोपांना उत्तर दिले नाही. मात्र इस्रायलच्या लष्करातून निवृत्त झालेल्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनीच सुलेमानी यांच्या हत्येत इस्रायलचा सहभाग असल्याचे जाहीर केले. सुलेमानी यांची हत्या इस्रायलसाठी मोठे यश होते, असा दावा या अधिकार्‍यांनी केला. यावर इराणकडून तीव्र प्रतिक्रिया अपेक्षित आहे.

इराणचे मेजर जनरल सुलेमानी यांना संपविण्यात इस्रायलचा हात - इस्रायलच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍याचा दावा२०२० सालच्या जानेवारीमध्ये इराकच्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर अमेरिकेने ड्रोन हल्ला चढविला होता. या हल्ल्यात मेजर जनरल कासेम सुलेमानी यांच्यासह इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटनेचा मोठा कमांडर ठार झाला होता. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईची माहिती उघड केल्यानंतर इराणने जगभरातील अमेरिकेच्या हितसंबंधांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. तर इराणमधील काही नेते व विश्‍लेषकांनी सुलेमानी यांच्या हत्येमागे इस्रायल असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी इस्रायलने या आरोपांना उत्तर दिले नव्हते. पण इस्रायली लष्कराच्या गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख मेजर जनरल तमिर हयमन यांनी नुकतीच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, सुलेमानी यांच्या हत्येत इस्रायलने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट केले. कासेम सुलेमानी हे सिरियातील इराणच्या इस्रायलविरोधी आघाडीचे प्रमुख होते. त्यामुळे त्यांची हत्या इस्रायलच मोठे यश असल्याचे हयमन यांनी सांगितले.

ऑक्टोबर महिन्यातच हयमन इस्रायली लष्कराच्या सेवेतून निवृत्त झाले. आपल्या कारकिर्दीत दोन लक्षणीय व महत्त्वाच्या मोहिमा पार पडल्या असून यामध्ये सुलेमानी यांच्या हत्येचा समावेश असल्याचे हयमन म्हणाले. सुलेमानी यांना ठार करण्यासाठी इस्रायलने नक्की कोणती भूमिका पार पाडली, याचे तपशील या इस्रायलच्या माजी अधिकार्‍यांनी दिले नाहीत.

इराणचे मेजर जनरल सुलेमानी यांना संपविण्यात इस्रायलचा हात - इस्रायलच्या निवृत्त लष्करी अधिकार्‍याचा दावापण काही महिन्यांपूर्वी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या हल्ल्याच्या काही तास आधी सुलेमानी यांच्या तीन फोन नंबर्सची माहिती इस्रायलने अमेरिकन कमांडला कळविली होती. सिरियातून विमान पकडण्याआधी सुलेमानी यांनी तीन वेळा आपले फोन बंद केले होते, याविषयीचे तपशील इस्रायलने अमेरिकेला पोहोचविल्याचा दावा करण्यात आला होता.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सुलेमानी तसेच अणुकार्यक्रमाशी संबंधित शास्त्रज्ञांची हत्या घडविणार्‍या अमेरिका व इस्रायलला कायमची अद्दल घडविण्याची धमकी दिली होती. अशा परिस्थितीत इस्रायलच्या माजी अधिकार्‍यांनी आत्ताच ही माहिती उघड करून इराणला चिथावणी दिल्याचे दिसत आहे. एकाच दिवसापूर्वी इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने इस्रायल अमेरिकेच्या पाठिंब्याखेरीज इराणवर हल्ला चढवू शकणार नाही, असा दावा केला होता. तसेच इराणच्या दिशेने इस्रायली क्षेपणास्त्रे प्रक्षेपित झाल्यानंतर, इस्रायल बेचिराख करण्याची धमकी इराणच्या या अधिकार्‍याने दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर, मेजर जनरल सुलेमानी यांच्या हत्येबाबतची माहिती उघड करून इस्रायलच्या माजी अधिकार्‍यांनी इराणला प्रत्युत्तर दिल्याचे दिसत आहे.

leave a reply