देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या २१६ वर पोहोचली रात्रीची संचारबंदी लावा, वॉर रूम स्थापन करा

- राज्यांना केंद्राच्या सूचना

नवी दिल्ली – ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंट डेल्टापेक्षा तिप्पट वेगाने पसरत असून राज्यांनी आता सावध व्हावे व संक्रमण वाढू नये यासाठी कडक उपाययोजना हाती घ्याव्यात, अशा सूचना केंद्र सरकारकडून राज्यांना करण्यात आल्या आहेत. मंगळवारी देशातील ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांची संख्या २१६ वर पोहोचली. महाराष्ट्रात आणखी ११ नवे रुग्ण आढळले, तर दिल्लीत चोवीस तासात ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढून ५४ वर पोहोचली. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना पत्र लिहून मोठ्या प्रमाणावर होणार्‍या गर्दीवर निर्बंध आणण्याचे, नाईट कर्फ्युसारख्या उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले.

देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या २१६ वर पोहोचली रात्रीची संचारबंदी लावा, वॉर रूम स्थापन करा - राज्यांना केंद्राच्या सूचनाजागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिअंटबाबत इशारा दिला आहे. तसेच अधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये हा व्हेरिअंट जास्त फैलावण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचवेळी या व्हेरिअंटवर लसीपेक्षा मास्कचा वापर जास्त प्रभावी ठरू शकेल, याकडे लक्ष वेधले आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कमुळे या व्हेरिअंटचे संक्रमण बर्‍याच प्रमाणात थोपवता येईल, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. भारतात डेल्टा व्हेरिअंटमुळे दुसर्‍या लाटेत हाहाकार उडाला होता. डब्ल्यूएचओच्या इशार्‍याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ओमिक्रॉन व्हेरिअंट आला असताना डेल्टा व्हेरिअंट अजून भारतातून पूर्णपणे गेलेला नाही, याची आठवण करून दिली आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पत्र लिहून यासंदर्भात सूचना केल्या आहेत. यानुसार कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्यावर भर द्या, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. रुग्ण आढळत असलेल्या भागात संक्रमण थोपविण्यासाठी कन्टेंमेंट झोन बनवा. स्थानिक व जिल्हा पातळ्यांवर असे कन्टेंमेंट झोन तयार करा, असे केंद्रीय आरोग्य सचिवांनी म्हटले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्यापासून रोखा. यासाठी कडक नियम तयार करा. ऑफीस, उद्योगांमध्ये आणि सार्वजनिक वाहतुकीमध्ये, तसेच लग्न समारंभातही उपस्थित संख्यांचे बंधन आणा, अशा सूचनाही केंद्रीय आरोग्य सचिवांनी केल्या आहेत.

तसेच आवश्यक त्या ठिकाणी नाईट कर्फ्यु अर्थात रात्रीची संचारबंदी लावण्यासही सांगण्यात आले आहे. राज्य सरकारांनी वॉर रुमची स्थापना करावी आणि परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून उपायोजना करावी. कोणत्याही परिस्थितीसाठी तयार रहावे, असे केंद्र सरकारने अधोरेखित केले आहे. ओमिक्रॉनचे संक्रमण वाढण्यापूर्वीच ते थांबविण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले.

दरम्यान, मंगळवारी देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. यामुळे देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या २१६ वर पोहोचली आहे. दिल्लीत आढळलेल्या तीन रुग्णांची कोणत्याही प्रवासाची नोंद नाही. यामुळे चिंता वाढल्या आहेत. गुजरात सरकारने आठ जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यु लावला आहे. तसेच कर्नाटक सरकारने काही जिल्ह्यात नियम कडक केले आहेत. ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

leave a reply