‘इस्रो’ आणि ‘ह्यूजेस’कडून देशातील पहिल्या व्यावसायिक ‘सॅटेलाईट इंटरनेट सेवेचा’ शुभारंभ

नवी दिल्ली – देशातील पहिली उपग्रह आधारित इंटरनेट सेवा इस्रो आणि ह्युजेस कम्युनिकेशनने सुरू केली आहे. या उपग्रह आधारीत हाय-थ्रुपूट इंटरनेट सेवेचा (एचटीएस) व्यावसायिक शुभारंभ देशात नवी क्रांती घेऊन आल्याचा दावा केला जातो यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात जेथे इंटरनेट सुविधा पोहोचविणे अद्याप अशक्य होते, तेथेही ब्रॉडबॅण्ड नेटवर्क पोहोचणार आहे. तसेच ब्रॉण्डबॅण्ड नेटवर्क अधिक भक्कम व वेगवान होणार आहे. जगात अनेक देशांना अशी उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पुरविणाऱ्या एलॉन मस्क यांच्या स्टारलिंकने याआधी भारतीय बाजारातही पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र परवान्याशिवाय बुकींग सुरू करणाऱ्या स्टारलिंकबाबत भारत सरकारने कठोर भूमिका घेतल्यावर स्टारलिंकने गाशा गुंडाळला होता. या पार्श्वभूमीवर इस्रोने आपल्या उपग्रह साखळीचे बळ पुरवून ह्युजेस कम्युनिकेशन (एचसीआय) या अमेरिकी कंपनीच्या सहाय्याने ही इंटरनेट सेवा सुरू केली आहे.

satellite internet serviceभारतात उपग्रहावर आधारित इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी इस्रोच्या ‘जीसॅट-११’ आणि ‘जीसॅट २९’चा वापर करण्यात येणार आहे. ‘एचसीआय’ देशात चांगल्या दर्जाची इंटरनेट सेवा पुरवेल. तसेच येत्या काळात ही सेवा सुधारण्यासाठी पावले उचलेल असा विश्वास अंतराळ विभागाचे सचिव व इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी व्यक्त केला आहे.

उपग्रह आधारित इंटरनेटसेवेमुळे देशभरात इंटरनेटचा वेग प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढेल. तसेच दुर्गम भागात देखील इंटरनेट मिळेल. सरकारी आणि खाजगी क्षेत्राला यामुळे मोठा फायदा होईल. या सेवेमुळे जीवनमान उंचावण्यास मदत मिळेल, असे सोमनाथ यांनी म्हटले आहे.
सरकारी वेबसाईटसह वित्त कंपन्या, सेल्युलर ऑपरेट, खाण व ऊर्जा क्षेत्रासह अन्य कंपन्यांना ना हाय-स्पीड इंटरनेटची आवश्यकता असते. सॅटेलाईटवर आधारित सेवेमुळे वेगवेगळ्या क्षेत्रासह खाजगी कंपन्यांना देखील या सेवेचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळेल. एचसीआय सध्या देशभरातील २ लाख व्यावसायिक आणि सरकारी वेबसाईटला सेवा पुरविते. तसेच स्टेजिक सेंटर आणि सरकारी प्रकल्पांसाठीही सेवा पुरविली जाते. यासाठी ‘एचसीआय’कडून ७५ उपग्रह व ह्युजेस ज्युपिटर सिस्टिमचा वापर केला जातो. दरम्यान, इस्रोकडून इंटलिजंट जीसॅट उपग्रहाची निर्मिती करण्यात येत आहे. यामुळे टेलिकम्युनिकेशन, टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग, वातावरणात होणारे बदल आणि हवामानाचं भाकित वर्तवणे, आपत्तीची चेतावणी, शोध आणि बचावकार्यात मोठ्या प्रमाणात मदत मिळेल.

यापूर्वी इस्रोने काही जीसॅट उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांपैकी ‘जीसॅट -१९’, ‘जीसॅट-११’ आणि ‘ज्युपिटर सिस्टीम’च्या मदतीने याआधीच ‘ह्युजेस कम्युनिकेशन्स इंडिया’ने काही नक्षलग्रस्त भागात सॅटेलाईट ब्रॉडबँड इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिली होती. मात्र ही प्रायोगिक तत्त्वावर व धोरणात्मक सेवा होती व काही क्षेत्रापुरतीच मर्यादीत होती. आता मात्र देशभरात या व्यावसायिक सेवेला शुभारंभ झाला आहे.

देशात सुरू करण्यात आलेल्या सॅटेलाईटवर इंटरनेट सेवेमुळे या योजनेचा लाभ ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ही राज्ये, अंदमान- निकोबार आणि लक्षद्वीप बेट तसेच नक्षलग्रस्त छत्तीसगड, झारखंड यासारख्या राज्यांमधल्या ग्रामपंचायतींना होईल. तसेच अगदी पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीतील दुर्गम गावांमध्येही इंटरनेट सुविधा पोहोचेल.

वर्षाच्या अखेरीस ‘गगनयान’च्या चाचण्यांना सुरुवात
२०२४ मध्ये प्रक्षेपण

नवी दिल्ली – या वर्षाच्या अखेरीस गगनयानच्या चाचणीला सुरुवात करण्यात येणार असून २०२४ मध्ये त्याचे प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय विज्ञानमंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली. गगनयान मोहिमेमुळे भारत अमेरिका, चीन आणि रशियानंतर मानवी अंतराळ मोहीम राबविणारा चौथा देश ठरेल. यावर्षीच ही मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही मोहीम लांबली.

या वर्षाच्याअखेर चाचण्यांना सुरुवात झाल्यावर २०२४ मध्ये दोन अंतराळवीरांना या यानातून पाठविण्यात येईल. यानाच्या जमिनीवरील चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी बंगळुरूमध्ये सुविधा उभारण्यात आली आहे. या मोहिमेसाठी सुमारे नऊ हजार २३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारताची क्षमता सर्वांना दिसून येईल.

leave a reply