इस्रोकडून ‘वनवेब’च्या आणखी 36 उपग्रहांच्या प्रक्षेपणाची तयारी

‘सीई-20’ क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी घेतली

बंगळुरू – इस्रोने तामिळनाडूमधील महेंद्रगिरी येथील प्रोपल्शन कॉम्प्लेक्सच्या (आयपीआरसी) ‘हाय अल्टिट्यूड टेस्ट’ केंद्रात ‘सीई-20’ या क्रायोजेनिक इंजिनची यशस्वी चाचणी घेतली. इस्रोच्या ‘एलव्हीएम13-एम3’ या मोहिमेसाठी हे इंजिन तयार करण्यात आले असून या मोहिमेत ‘वनवेब’च्या आणखी 36 उपग्रहांचे पुढील वर्षी प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

ISROइस्रोतर्फे नुकतेच ब्रिटीश कंपनी ‘वनवेब’चे तब्बल 36 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले होते. या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी ‘लॉन्च व्हेईकल मार्क-3’चा (एलव्हीएम3) वापर करण्यात आला होता. एलव्हीएम3 च्या सहाय्याने आठ टनापेक्षा अधिक वजनाचे उपग्रह वाहून नेता येऊ शकतात. या यशस्वी मोहिमेनंतर आता ‘वनवेब’च्या आणखी 36 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येईल. ही मोहीम जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये राबविण्यात येईल.

23 ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेल्या या मोहिमेनंतर सहा दिवसातच ‘सीई-20’ इंजिनची चाचणी घेण्यात आली. पुढील मोहिमेसाठी ‘एलव्हीएम3-एम3’ रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी या इंजिनची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी 25 सेकंदासाठी घेण्यात आली. ही चाचणी इंजिनच्या हार्डवेअरची मजबुती तपासण्यासाठी घेण्यात आली. या चाचणीच्या माध्यमातून रॉकेट प्रक्षेपकातील सर्व यंत्रणांच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले.

अवकाश प्रक्षेपण क्षेत्रातील इस्रोची व्यावसायिक कंपनी असलेल्या ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’ने (एनएसएल) उपग्रह प्रक्षेपणासाठी ‘वनवेब’ बरोबर करार केला होता. या करारानुसार पहिले 37 उपग्रह अवकाशात सोडण्याची मोहीम फत्ते झाल्यानंतर जागतिक उपग्रह प्रक्षेपण बाजारपेठेतील भारताचा दबदबा वाढला आहे.

‘वनवेब’कडून जगभरात हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीसाठी 648 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. 23 ऑक्टोबर रोजी इस्रोने 36 उपग्रहाचे प्रक्षेपण केल्याने ‘वनवेब’च्या प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांची संख्या 462 झाली आहे. ‘वनवेब’ची ही या वर्षातील ही दुसरी तर आतापर्यंत 14 वी मोहीम होती. हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीसाठी प्रयत्न करत असलेल्या ‘वनवेब’चे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. ‘वनवेब’ आणि ‘न्यूस्पेस इंडिया लिमिटेड’मध्ये (एनएसएल) झालेल्या करारानुसार लडाख ते कन्याकुमारी आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेशमध्ये गावे, नगरपालिका, शाळा आणि अगदी देशाच्या दुर्गम कोपऱ्यात सुरक्षित असे नेटवर्क पोहोचविण्यात येईल.

‘वनवेब’बरोबर सहकार्य वाढविण्यासाठी इस्रोतर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. ही देशासाठी आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी एक ऐतिहासिक घटना असल्याचे इस्रोचे अध्यक्ष आणि अवकाश विभागाचे सचिव एस. सोमनाथ यांनी म्हटले आहे.

leave a reply