आसियनच्या बैठकीत साऊथ चायना सीमधील ‘कोड ऑफ कंडक्ट’चा मुद्दा ऐरणीवर

- अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेची ‘साऊथ चायना सी’मध्ये गस्त

जकार्ता/वॉशिंग्टन – साऊथ चायना सी क्षेत्रातील वाद सोडविण्यासाठी ‘कोड ऑफ कंडक्ट’ महत्त्वाची बाब असून आसियन देशांच्या बैठकीतही याच मुद्याला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती इंडोनेशियाच्या परराष्ट्रमंत्री रेत्नो मर्सुदी यांनी दिली. शुक्रवारपासून इंडोनेशियाची राजधानी जाकार्तामध्ये आग्नेय आशियाई देशांची संघटना आसियनची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत ‘कोड ऑफ कंडक्ट’च्या मुद्यावर आसियनच्या सदस्य देशांमध्ये एकमत घडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. चीनने संपूर्ण साऊथ चायना सीवर आपला मालकी हक्क सांगितला असून आग्नेय आशियाई देशांशी द्विपक्षीय चर्चा करून दडपण टाकत आहे. मात्र आसियन देशांनी याविरोधात आग्रही भूमिका घेऊन चीनची योजना उधळण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आसियनची बैठक सुरू असतानाच अमेरिकेची ‘युएसएस निमित्झ’ ही विमानवाहू युद्धनौका साऊथ चायना सीमध्ये गस्तीसाठी दाखल झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तैवानला सातत्याने आक्रमणाच्या धमक्या देण्यात येत असून फिलिपाईन्स, व्हिएतनाम यासारख्या देशांच्या हद्दीतही सातत्याने घुसखोरी सुरू आहे. आपल्या हवाई व नौदल सामर्थ्याच्या बळावर चीन साऊथ चायना सीमधील छोट्या आशियाई देशांवर दडपण आणत असून अधिकाधिक क्षेत्र बळकावण्याच्या हालचाली सुरू आहेत.

याविरोधात आशियाई देशांनी आवाज उठविण्यास सुरुवात केली असून संरक्षणसामर्थ्यातही भर टाकण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्याचवेळी चीनच्या कारवायांना ‘कोड ऑफ कंडक्ट’सारख्या राजनैतिक मार्गाने प्रत्युत्तर देण्यासाठी काही आशियाई देशांनी पुढाकार घेतला आहे. इंडोनेशिया, व्हिएतनाम व मलेशिया या देश यात आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर इंडोनेशियात होणारी आसियनची बैठक व त्यातील अजेंडा महत्त्वाचा ठरतो.

आसियनची बैठक सुरू असतानाच अमेरिकेची ‘युएसएस निमित्झ’ ही विमानवाहू युद्धनौका गस्ती मोहिमेसाठी साऊथ चायना सीमध्ये दाखल झाली आहे. या क्षेत्रात शांतता व स्थैर्य कायम राखणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे ‘युएसएस निमित्झ’वरील अमेरिकी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. अमेरिकी युद्धनौकांचा साऊथ चायना सीमधील वावर चीनला रोखण्यासाठी मोलाचे योगदान देणारा ठरतो, असा दावा बायडेन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केला. अमेरिकी युद्धनौका गस्त घालीत असतानाच चीनच्या तटरक्षकदलानेही आपल्या ताफ्यातील जहाजांसह मोहिमांची संख्या वाढविली आहे. जपानी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने गेल्या काही महिन्यांमध्ये आपल्या तटरक्षक दलात २२ नव्या जहाजांचा समावेश केला आहे. त्यामुळे चीनच्या तटरक्षक दलातील जहाजांची संख्या दीडशेवर गेल्याचे सांगण्यात येते.

दरम्यान, अमेरिकेचे निवृत्त हवाईदल अधिकारी जनरल जॅक किन यांनी, अमेरिकेची संरक्षणदले चीनविरोधातील युद्धासाठी तयार नसल्याचा इशारा दिला. तैवानने अमेरिकेबरोबर करार करून खरेदी केलेली जवळपास २० अब्ज डॉलर्सची शस्त्रे व संरक्षणयंत्रणा अद्याप तैवानला देण्यात आलेल्या नाहीत. हा ‘बॅकलॉग’ विचारात घेतला तर अमेरिकेची या क्षेत्रातील तयारी समजून येते, असा टोला किन यांनी लगावला आहे.

काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या हवाईदलाचे वरिष्ठ अधिकारी जनरल माईक मिनीहान यांनी,२०२५ सालापर्यंत चीनबरोबरच्या युद्धासाठी अमेरिकेच्या हवाईदलाने सज्ज रहावे असा इशारा दिला होता.

leave a reply