इराणमधील छुप्या हल्ल्यांबाबत इस्रायल, अमेरिकेत एकमत

- इस्रायलने इराणमधील तीन हजार टार्गेट्स निश्चित केले

तेल अविव – इराणविरोधात युद्ध पुकारण्याच्या भूमिकेला अमेरिकेचे समर्थन नाही. पण इराणमध्ये छुपे हल्ले चढविण्यासाठी अमेरिका इस्रायलला अनुकूल आहे. जर इराण अणुबॉम्ब निर्मितीच्या जवळ पोहोचलाच तर अमेरिका पुढील कारवाईचा निर्णय घेईल, अशी माहिती इस्रायलमधील आघाडीच्या वर्तमानपत्राने दिली. इस्रायलने देखील इराणमधील किमान ३००० अतिमहत्त्वाच्या लष्करी ठिकाणांची यादी तयार करून आपले टार्गेट्स निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या वरिष्ठ नेत्यांनी इराणवर हल्ल्याची तयारी झाल्याचा इशारा दिला होता.

इस्रायलच्या सत्तेवर आलेले बेंजामिन नेत्यान्याहू यांचे सरकार इराणबाबत अधिक आक्रमक धोरण स्वीकारणार असल्याचे संकेत विश्लेषक देत होते. या पार्श्वभूमीवर, गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन व त्याआधी सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी इस्रायलचा दौरा केला होता. इस्रायलला इराणविरोधातील युद्धापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या नेत्यांनी महिन्याभरात इस्रायलला भेट दिल्याचे दावे केले जात होते. ब्लिंकन आणि नेत्यान्याहू यांच्यात झालेल्या चर्चेत पॅलेस्टाईन, इराण आणि सौदी अरेबिया हे विषय आघाडीवर होते, ही माहिती समोर आली आहे.

सौदीबरोबर राजकीय सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी इस्रायलच्या भूमिकेला अमेरिकेचे पूर्ण समर्थन असल्याचे ब्लिंकन यांनी या भेटीत स्पष्ट केले. तर इराणबाबतच्या इस्रायलच्या भूमिकेविषयी अमेरिकेचे समर्थन नाही, या मुद्यावर ब्लिंकन यांनी नेत्यान्याहू यांच्याशी चर्चा केली. इस्रायलने इराणवर थेट हल्ला चढवू नये, युद्ध पुकारू नये, असे आवाहन अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले. याउलट इस्रायलने इराणमध्ये छुपे हल्ले सुरू करावे, असे अमेरिकेने सुचविल्याची बातमी ‘येदिओथ अरोनोथ’ या इस्रायली वर्तमानपत्राने दिली. त्याचबरोबर इराण अणुबॉम्बच्या निर्मितीजवळ पोहोचलाच तर त्यापुढील कारवाईचा निर्णय अमेरिका घेईल, असेही ब्लिंकन यांनी टकारले.

इराणबाबत अमेरिकेचे सहकार्य हवे असेल तर इस्रायलने जेरूसलेममधील पॅलेस्टिनींच्या प्रार्थनास्थळासंबंधीच्या आपल्या कारवाया थांबवाव्या, अशी अटही अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायलसमोर ठेवल्याचा दावा केला जातो. अमेरिकेच्या या प्रस्तावावर इस्रायलने कोणती प्रतिक्रिया दिली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण फ्रान्समधील रेडिओवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने पाश्चिमात्य देशांच्या सहाय्याने इराणवर हल्ल्याची योजना आखली आहे. इराणच्या लष्कराशी संबंधित ३००० ठिकाणांवर हल्ले चढविण्याची योजना इस्रायलने आखली आहे. पण इराणबरोबर युद्ध पेटणार नाही, अशी काळजी घेऊनच ही कारवाई करण्याची तयारी इस्रायलने केली आहे. या घडामोडींची माहिती असलेल्या राजनैतिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने फ्रेंच रेडिओवाहिनीने ही माहिती दिली.

दरम्यान, इस्रायल सरकारकडून याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पण इराणच्या इस्फाहन क्षेपणास्त्र निर्मितीच्या तळावर झालेल्या हल्ल्यासाठी इस्रायलला जबाबदार धरत आहे. इराणमधील कुर्दांच्या सहाय्याने इस्रायलने क्षेपणास्त्रांची निर्मिती करणाऱ्या कारखान्याला लक्ष्य केल्याचा आरोप इराण करीत आहे. त्याचबरोबर इस्फाहनवरील हल्ल्यांना योग्यवेळी प्रत्युत्तर दिले जाईल, अशी धमकी इराणचे नेते देत आहेत.

leave a reply