परराष्ट्रमंत्री जयशंकर कुवैतच्या दौर्‍यावर

दोहा – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर कतारच्या दौर्‍यावर आहेत. भारतात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना, कतारने केलेल्या सहाय्याबद्दल परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आभार मानले. कतारच्या दौर्‍यानंतर परराष्ट्रमंत्री जयशंकर कुवैतला भेट देणार आहेत. आखाती क्षेत्रातील अस्थैर्य वाढत असताना, भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा आखाती देशांचा दौरा लक्षवेधी ठरतो. विशेषतः आखाती देश भारताबरोबर इंधनविषयक सहकार्य अधिकाधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करीत असताना व इराणकडून देखील भारताला नवा प्रस्ताव दिला जात असताना, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या या दौर्‍याचे महत्त्व वाढल्याचे दिसते.

कुवैतच्या दौर्‍यावरपरराष्ट्रमंत्री जयशंकर कुवैतच्या तीन दिवसांच्या दौर्‍यासाठी निघाले होते. त्याआधी त्यांनी कतारची राजधानी दोहा येथे कतारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद बिन अहमद अल मेस्नेद यांची भेट घेतली. कोरोनाच्या विरोधात भारत लढा देत असताना कतारने केलेल्या सहाय्याबद्दल परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी आभार मानले. तसेच कतारच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांबरोबर झालेल्या चर्चेवरही परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. यानंतर जयशंकर कुवैतच्या भेटीवर जाणार असून या भेटीत दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण सहकार्यावर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत मिळत आहेत.

कुवैतचे परराष्ट्रमंत्री ‘शेख अहमद नासिर अल-मोहम्मद अल-सबाह’ यांनी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना या दौर्‍याचे आमंत्रण दिले होते. भारत व कुवैतमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक भक्कम करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आल्याचा दावा केला जातो. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा हा पाहिलाच कुवैत दौरा ठरतो. या दौर्‍यात ते कुवैतच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करतील. तसेच कुवैतमधील भारतीय समुदायालाही परराष्ट्रमंत्री जयशंकर संबोधित करणार आहेत. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवैतचे आमिर ‘शेख नवाफ अल-अहमद अल-झबेर अल-सबाह’ यांच्यासाठी दिलेले पत्र यावेळी परराष्ट्रमंत्री जयशंकर त्यांना देणार असल्याचे वृत्त आहे.

भारत आणि कुवैतमधील संबंधांना साठ वर्षे पूर्ण होत आहेत. कुवैतमध्ये सुमारे दहा लाख भारतीय कार्यरत आहेत. पुढच्या काळात भारत व कुवैतमधील सहकार्य अधिकच दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांनी केलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा हा दौरा त्यासाठी उपकारक ठरेल, असे बोलले जाते. दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना, भारतीय अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भारतातील इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार असून इंधन उत्पादक देश भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. त्याचवेळी जगभरात वाढत असलेल्या अस्थैर्याच्या पार्श्‍वभूमीवर, भारत देखील आपली इंधन सुरक्षा अधिकच भक्कम करण्याच्या तयारीत आहे. यामुळे आखाती देशांबरोबरील भारताच्या सहकार्याचे महत्त्वही त्याच प्रमाणात वाढत असल्याचे दिसते.

leave a reply