जम्मू-काश्मीरमध्ये विदेशी दहशतवाद्यांना बाहेर येणे भाग पडले

- लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक दहशतवाद्यांची संख्या घटली आहे. दहशतवादाच्या मार्गाने जाऊन काही हाती लागणार नाही, याची जाणीव जम्मू-काश्मीरच्या तरुणांना झाली आहे. त्यामुळे तरुण आता दहशतवाद्यांपासून दूर राहत आहेत. यामुळे आता लपून राहत असलेल्या परदेशी दहशतवाद्यांना त्यांच्या बिळातून बाहेर पडणे भाग पडले आहे, असे लेफ्टनंट जनरल डी. पी. पांडे यांनी म्हटले आहे. तसेच इतर देशांमधली शस्त्रे जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचत आहेत, हे मोठे आव्हान असल्याचे लष्कराचे लेफ्टनंट जनरल पांडे यांनी लक्षात आणून दिले.

जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करून दाखल झालेले विदेशी दहशतवादी बहुतांश शांत असतात. ते आपल्या छुप्या ठिकाणांवरुन कार्यरत असले तरी घातपातांसाठी ते स्थानिक दहशतवाद्यांचा वापर करतात. स्थानिक दहशतवादी हाच त्यांचा चेहरा असतो. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी मारले जात आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील तरुण आता दहशतवादाच्या मार्गावर जाण्यासाठी धजत नाहीत. तरुणांना हा मार्ग निरर्थक असल्याची जाणीव झाली आहे. म्हणून स्थानिक दहशतवाद्यांची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यामुळे आपल्या ठिकाणांवर लपून राहून काम करणाऱ्या परदेशी दहशतवाद्यांना आता बाहेर पडणे भाग पडत असल्याचे लेफ्टनंट जनरल पांडे म्हणाले.

लेफ्टनंट जनरल पांडे यांनी पाकिस्तानचे नाव घेतले नसले, तरी पांडे यांनी उल्लेख केलेले विदेशी दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट होते. गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी दहशतवादी चकमकीत मारले गेले आहेत. यावर्षी आतापर्यंत चकमकीत 61 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले, यामध्ये 15 पाकिस्तानी होते. यामुळे दहशतवादी कारवायांमधला पाकिस्तानचा सहभाग पुन्हा एकदा उघडझाला आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानसारख्या देशात अमेरिका मागे टाकून गेलेली शस्त्रास्त्रे जम्मू व काश्मीरपर्यंत पोहोतच असल्याची जाणीव लेफ्टनंट जनरल पांडे यांनी करून दिली आहे. थेट उल्लेख केला नसला, तरी हे मोठे आव्हान असल्याचे लेफ्टनंट जनरल पांडे यांनी लक्षात आणून दिले आहे.

leave a reply