युक्रेनच्या युद्धात कुणीही विजयी ठरणार नाही

- जर्मनीच्या भेटीवर असलेल्या पंतप्रधान मोदी यांचा इशारा

बर्लिन – रशिया-युक्रेनच्या युद्धात कुणीही विजयी ठरणार नाही. म्हणूनच भारत शांततेचा पुरस्कार करून राजनैतिक वाटाघाटींची मागणी करीत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. जर्मनीच्या भेटीवर असताना, पंतप्रधानांनी युक्रेनच्या युद्धासंदर्भात भारताची भूमिका परखडपणे मांडली. त्याचवेळी जर्मनीबरोबरील भारताच्या विविध क्षेत्रातील सहकार्याचे उभय देशांचे क्षेत्र व जागतिक स्तरावर सकारात्मक परिणाम होतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला आहे.

जर्मनीमध्ये पंतप्रधान मोदी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदी यांची जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांच्यात भारत व जर्मनीमधील ‘इंटर गव्हर्मेंटल कन्सल्टेशन्स-आयजीसी’ची चर्चा पार पडली. दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद संबोधित करून या द्विपक्षीय सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. ऊर्जेपासून ते पर्यावरणापर्यंत अनेक क्षेत्रात भारत व जर्मनी सहकार्य करणार असून याचे क्षेत्रिय व जागतिक पातळीवर सकारात्मक परिणाम होतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या या जर्मन दौऱ्याच्या आधी, अमेरिकेच्या दडपणामुळे जी7 परिषदेचे आयोजन करणाऱ्या जर्मनीने भारताला आमंत्रण नाकारल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. युक्रेनचे युद्ध पेटल्यानंतरही रशियाबरोबरील सहकार्य कायम ठेवण्याचा निर्णयभारताने घेतला होता. यामुळे संतापलेल्या अमेरिकेने दबाव टाकून जी7मध्ये भारताचे पंतप्रधान सहभागी होणार नाही, याची तजवीज केली होती. मात्र माध्यमांना संबोधित करताना जर्मनीच्या चॅन्सेलर शोल्झ यांनी जी7 परिषदेसाठी भारताच्या पंतप्रधानांना आमंत्रित करण्याची घोषणा केली. यामुळे भारताचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे दिसत आहे.

युक्रेनच्या युद्धात कुणीही विजयी ठरणार नाही, उलट सर्वांचीच हानी होईल. म्हणूनच आम्ही शांततेचा पुरस्कार करीत आहोत, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भातील देशाची भूमिका मांडली. तसेच युक्रेनच्या युद्धामुळे इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. अन्नधान्य व खतांची टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका जगातील प्रत्येक कुटुंबाला बसत आहे. विशेषतः विकसनशील व गरीब देशांवर याचे भयावह परिणाम होत आहेत, याची जाणीव पंतप्रधानांनी यावेळी करून दिली.

याबरोबरच या युद्धाच्या भयंकर परिणामांची भारताला चिंता वाटत असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी यांनी हे युद्ध त्वरित रोखणे आवश्यक आहे, असे बजावले. जर्मनीच्या दौऱ्यावर असताना, पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनच्या युद्धाबाबत केलेली ही विधाने लक्षवेधी ठरतात. रशियाशी मैत्रीपूर्ण सहकार्य असलेल्या भारताने आपल्या प्रभावाचा वापर करून रशियाला हे युद्ध रोखण्यास भाग पाडावे, अशी अपेक्षा युरोपिय देश व्यक्त करीत आहेत. त्याचवेळी रशियाने देखील हे युद्ध रोखण्यासाठी भारताने मध्यस्थी केली तर त्याचे आम्ही स्वागत करू, असे जाहीर केले होते. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी यांचा जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स दौरा सुरू झाला आहे. म्हणूनच जर्मनीमध्ये युक्रेनच्या युद्धाबाबत पंतप्रधानांनी केलेली विधाने राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरतात.

अमेरिका व काही युरोपिय देश युक्रेनचे युद्ध दशकभरासाठी लांबेल, असे भयावह इशारे देत आहेत. तर या युद्धाची झळ बसत असलेल्या देशांना मात्र युक्रेनचे युद्ध लवकरात लवकर संपुष्टात यावे, असे वाटत आहे. रशियाच्या इंधनावर अवलंबून असलेल्या जर्मनीचाही यात समावेश आहे. त्याचवेळी फ्रान्स देखील युक्रेनचे युद्ध थांबविण्यासाठी अमेरिकेच्या नाराजीची पर्वा न करता रशियन राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करीत आहे. या दोन्ही देशांसह भारताने युक्रेनमधील रक्तपात थांबविण्यासाठी प्रयत्न केला, तर त्याचे सकारात्मक परिणाम पुढच्या काळात समोर येऊ शकतात.

leave a reply