जपान भारतात पाच ट्रिलियन येन इतकी गुंतवणूक करण्यास उत्सुक

-जपानच्या उपराजदूतांची घोषणा

गुवाहाटी – पुढच्या पाच वर्षात जपान भारतात तब्बल पाच ट्रिलियन येन अर्थात तीन लाख, 20 हजार कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे, असे जपानचे भारतातील उपराजदूत कवाझू कुनिहिको यांनी म्हटले आहे. मात्र जपानच्या या गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी भारतालाच पार पडावी लागेल. तसे झाले तरच जपान आपल्या गुंतवणुकीचे हे लक्ष्य गाठू शकेल, याचीही परखड जाणीव जपानच्या उपराजदूतांनी करून दिली.

Japan-investआसामच्या गुवाहाटी येथे सुरू असलेल्या ‘नॅचरल अलायज्‌‍ इन डेव्हलपमेंट अँड इंटरडिपेंडन्स्‌‍-एनएडीआय-नदी’ या परिषदेदरम्यान कुनिहिको यांनी आपल्या देशाची भूमिका मांडली. भारत आणि जपानचे सर्वच क्षेत्रात सहकार्य प्रस्थापित होत आहे. 21 शतकात दोन्ही देशांचे संबंध विकसितच होत राहिले. पुढच्या पाच वर्षात जपान भारतात सुमारे पाच ट्रिलियन येन इतकी गुंतवणूक करण्यासाठी उत्सूक आहे. रुपयांमध्ये ही रक्कम तीन लाख, 20 हजार कोटींवर जाते. पायाभूत सुविधा क्षेत्र, उत्पादन आणि हवामान बदल ही जपानच्या भारतातील गुंतवणुकीसाठी महत्त्वाची क्षेत्रे असल्याचे कुनिहिको म्हणाले.

पाच वर्षात हे गुंतवणुकीचे ध्येय जपानला गाठायचे आहे. पण यासाठी भारताला आपली जबाबदारी पार पडावी लागेल. त्याखेरीज जपान हे गुंतवणुकीचे ध्येय गाठू शकत नाही, असे जपानच्या उपराजदूतांनी स्पष्ट केले. गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती म्हणजे विजेचा स्थीर पुरवठा, पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना आणि धोरणातील स्थैर्य, हे सारे अपेक्षित असल्याचे उपराजदूत कुनिहिको यांनी म्हटले आहे.

भारताबरोबरच जपान बांगलादेशमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करीत असल्याची माहिती यावेळी कुनिहिको यांनी दिली. एकाच देशाने प्रगती करावी व त्याच्या शेजारी देशाने मागासलेले रहावे, हे काही जपानचे धोरण असू शकत नाही. म्हणूनच जपान भारताच्या शेजारी देशांना भारताच्या सहकार्याने आवश्यक ते सहाय्य करीत असल्याचा दावा कुनिहिको यांनी केला. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांसाठीही आम्ही आर्थिक स्वावलंबन आणि राजकीय स्वायत्ततेचे धोरण स्वीकारलेले आहे.

या आघाडीवर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांना सहाय्य करण्यासाठी भारत व जपान सहकार्य करीत असल्याचे कुनिहिको पुढे म्हणाले. भारताच्या परराष्ट्र धोरणात बंगालच्या उपसागराला आणि ईशान्येकडील भागाला विशेष महत्त्व दिले जात आहे. याला जपानबरोबरील भारताच्या सहकार्यात फार मोठे स्थान असल्याचे कुनिहिको यांनी यावेळी लक्षात आणून दिले आहे.

leave a reply